नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील कुंभारवाडा रस्त्यावरील उतारावर दुचाकीच्या हॅण्डलला अडकविलेली ५० हजार रुपयांची पिशवी चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील वडकळंबी येथील विलास नवग्या गावित हे नवापूर येथील युनियन बॅँकेच्या खात्यातून ५० हजार रुपये काढून एका कापडी पिशवीत पैसे ठेवून दुचाकीच्या (क्र.एम.एच.३९ क्यू २२३९) हॅण्डलला पिशवी अडकवून नवापूर शहरातील कुंभारवाडा रस्त्याने वडकळंबी गावी जात होते. यावेळी कुंभारवाड्याच्या रस्त्याच्या उतारावरुन जात असतांना अज्ञाताने विलास गावित यांच्या शर्टाच्या मागे थंड शरबतासारखे द्रव्य टाकून नजर चुकवून दुचाकीच्या हॅण्डलाल अडकविलेली ५० हजार रुपयांची पिशवी चोरुन नेली.
याबाबत विलास गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ करीत आहेत.