नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्रीमती डी.आर. हायस्कूल मध्ये शासन निर्देशानुसार पुस्तक मेळावा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे व ग्रंथाचेपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे,उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी,पर्यवेक्षक पंकज पाठक,ग्रंथपाल मंगेश उपासनी व मराठी विभाग प्रमुख ज्येष्ठ शिक्षिका राजश्री गायकवाड उपस्थित होते.
पुस्तक मेळाव्यानिमित्त इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. इयत्ते नुसार विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकाचे व मा.मुख्याध्यापक यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आलेल्या श्यामची आई पुस्तकाचेही वाचन केले. तसेच ‘मी वाचलेले पुस्तक’या उपक्रमाचेअभिप्राय विराज वायकर,सार्थक पवार, धिरज नांदुरकर, वेदांत पाटील, हितेश बावा,गणेश जरे या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात नारायण भदाणे यांनी वाचनाचे जीवनातील महत्त्व जाणून घेऊन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावी विज्ञानाने जरी अफाट प्रगती केली असली तरी वाचनाने आपले व्यक्तिमत्व फुलते. आपल्या ग्रंथालयातील 16000 विविध पुस्तके उपलब्ध आहेत त्यांचे वाचन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
अभिप्राय व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जानी,प्रास्ताविक पर्यवेक्षक पंकज पाठक, तर आभार कमल चौरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.