नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील वाहनाअपघातांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येकाने सावधानतेने वाहन चालवणे गरजेचे आहे. जिल्हा पोलीस दल आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या सहकार्याने अवघ्या तीन तासात 36 वाहनांवर कारवाई करून 48 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याचबरोबर जिल्ह्यातील अपघात प्रवण ठिकाणे शोधूनआवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविणे, दिशादर्शक फलके लावण्याबाबत अभियान राबविण्यात येईल.असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले.
दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्ह्यातील ड्रायव्हिंग स्कूल यांच्या सहकार्याने सुमारे 250 महाविद्यालयीन दुचाकी वाहनधारक विद्यार्थी विद्यार्थिनींना हेल्मेट वितरित आले. नंदुरबार प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, सहाय्यक उप प्रादेशिक अधिकारी उत्तम जाधव ,उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत पाटील, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश देवरे, प्रा. डी.व्हीो.सोनवणे उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी सांगितले की, मोबाईल तथा ड्रंक अँड ड्राईव्हच्या 175 केसेस करून त्यांचा वाहन परवाना रद्द करण्यात आला. जिल्ह्यात स्पीड गनच्या 48 केसेस नोंद करण्यात आल्या.याचबरोबर विविध शाळा महाविद्यालयांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत वेळोवेळी प्रबोधन करण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या समारोपानिमित्त जिल्ह्यातील ड्रायव्हिंग स्कूल आणि पियूसी सेंटर यांच्या सहकार्याने सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले.








