शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी ‘जमिनीचे आरोग्य व कृषी शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत पिंप्री येथील गणेश मनीलाल पाटील यांच्या शेतावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांकडून जलदिंडी, पर्यावरण जनजागृती, धुम्रपान निषेध आदी विषयांवर प्रबोधनात्मक फेरी काढण्यात आली.
विद्यार्थ्यांनी गावात तसेच मंदिर व शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. वृक्षारोपणाचा कार्यक्रमही घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वतीने जमिनीचे आरोग्य व शिक्षणाचे महत्त्व या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. ग्रामस्थांनी पथनाट्यास उस्फूर्त प्रतिसाद दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एल. पटेल, कार्यक्रम अधिकारी प्रा .पी.वाय. पेंढारकर,महाविद्यालयाचे प्राध्यापक, इतर कर्मचारी रासेयो स्वयंसेवक, ग्रामस्थ यांनी शिबिरात सहभाग नोंदविला. शिबिरासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा .मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.








