शहादा l प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी पुस्तकी ज्ञानासोबतच कला- गुणही महत्त्वाचे ठरत असतात. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत यशस्वीतेकडे वाटचाल करावी असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चव्हाण यांनी केले.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयातील कृषकोत्सव 2023 अंतर्गत 19 व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील होते. यावेळी सुरत डिस्ट्रिक्ट बँकेचे संचालक दिलीप रघुनाथ पाटील, निझर तालुका सर्वांगी विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन सुनील श्रीपत पटेल, मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश गिरिधर पाटील,संचालक रमाकांत संभू पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील सखाराम पाटील, उपसभापती रवींद्र रावल, जगदीश पटेल निझर, मगन पटेल, एकनाथ पटेल, प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल. पटेल आदींची उपस्थिती होती.
डॉ.चव्हाण म्हणाले, व्यक्तिला आपल्यातील कला, गुण व गुणवत्ता पुढे नेत असते. ज्ञान,कला व गुणवत्ता सर्वत्र पूजनीय ठरत असते. व्यक्तीला स्वतःतील दर्जा स्वतःच सिद्ध करावा लागतो. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करणे यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण ठरते. याप्रसंगी जगदीश पटेल, सुनीलभाई पटेल यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात दीपकभाई पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व कठोर मेहनत घेण्याचे सांगितले. योग्य मार्गाने वाटचाल करण्यासोबतच सहकार्य वृत्ती अंगी जोपासावी असे आवाहन केले.

पारितोषिक वितरण कृषकोत्सव 2023 मधील शैक्षणिक व अभ्यासपूर्वक उपक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. एन.जे.पाटील प्राचार्य डॉ .एस.पी.पवार, प्राचार्य बी.के.सोनी यांचीही उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा .चंद्रशेखर पाटील यांनी केले.अहवाल वाचन विद्यार्थी प्रतिनिधी पियुष पवार यांनी केले. आभार प्रा.डाॅ.भरत चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








