नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील एका रेडीमेड दुकानासमोर दुचाकी पार्क करण्याच्या कारणावरुन एकाच्या गळ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला असता सदर वार चुकविल्याने हातावर दुखापत केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील चिंचपाडा भिलाटी येथील दिपक शामा ठाकरे याने गोपी रेडीमेड ड्रेस कलेक्शन दुकानासमोर दुचाकी पार्क करीत असतांना सचिन आप्पा बाबर याला बाजूला व्हा, असे सांगितले. याचा राग आल्याने सचिन बाबर याने दिपक ठाकरे यांना जिवेठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता सदर वार दिपक ठाकरे यांनी चुकविल्याने त्यांच्या हातावर दुखापत झाली.
तसेच सचिन बाबर यांच्या सोबत असलेल्या तिघा अनोळखी इसमांनी दिपक ठाकरे यांना हाताबुक्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत दिपक ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक स्नेहदिप शिंदे करीत आहेत.








