नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा शहरालगतच्या कुकडेल भागातील शनि मंदिराच्या पाठीमागे पुरातन भावसार समाज मढीच्या जागेवर खोदकाम सुरू असतांना शिवलिंग, चबुतरा व पादुका आढळून आल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. शनि मंदीराच्या पाठीमागील भाग ऐतिहासिक व धार्मिक असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
गोमाई नदीकाठालगत शनि मंदिराच्या पाठीमागे भावसार समाजाची जागा असून हा परिसर गेल्या अनेक दिवसांपासून निर्मनुष्य असतो. याच जागेवर शिवलिंग व चबुतरा असल्याचे एका युवकाने सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ जाधव यांना सांगितले. यामुळे भावसार समाजाध्यक्ष शिरीष भावसार यांच्याशी याबाबत चर्चा करून त्या ठिकाणी खोदकाम करण्यास सुरुवात केली असता सहा फुटानंतर एक चबुतरा व त्याखाली शिवलिंग दिसून आले.

शिवलिंग आढळून आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वेदमूर्ती रमेश शास्त्री यांनी शहादा शहर गोमाई नदी भागात बसलेले असल्याने येथे पुरातन, धार्मिक व ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आढळून येतात. प्रकाशा येथील टेकडीवर काम करतांना देवीची मूर्ती दिसून आली होती.पाडळदा येथेही तोफांचे अवशेष आढळून आले.आता कुकडेल परिसरातही शिवलिंग आढळून आले आहे.यामुळे या शहादा तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभल्याचे सांगण्यात येत आहे. शिवलिंग आढळून आलेला परिसर प्राचीन भाग आहे. याच भागात यादव काळातील पंचमुखी महादेव मंदिर तसेच रामेश्वर मंदिर आदी प्राचीन वास्तू आहेत. होळकरांच्या काळातील कागदपत्रात या मंदिरांसंदर्भात माहिती मिळते. मागच्या पिढीतील लोकांनी या वास्तू पाहिल्या असल्याचा उल्लेख मिळतो, असे ८४ वर्षीय वेद मूर्ती रमेश शास्त्री यांनी सांगितले.








