नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील विखरण येथील एका विधवा महिलेच्या इनामी शेत जमिनीतील सातबाऱ्यावर इतर हक्क नोंद करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी शासनाने नियम धाब्यावर बसवून हा प्रकार केला असून त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार आघाडी जिल्हाअध्यक्ष संजय बगदे यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीत बगदे यांनी म्हटले आहे की, विखरण येथील 247/3 अ क्षेत्र 2 हेक्टर 25 आर ही शेतजमीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हिंमत ओंकार कोळी यांना कब्जा हक्क भरून वाटप केलेली नवीन शर्तीची शेतजमीन आहे.
राज्यात स्वातंत्र्याचा 75 वर्ष पूर्ण होऊन अमृत महोत्सव निमित्त ऑनलाइन सातबारा मोफत घरपोच वाटप मोहीम राज्य शासनाने हाती घेतलेली आहे. या मोहीम अंतर्गत युद्धपातळीवर सातबाऱ्यावरील त्रुटी दूर करणे , इतर अधिकारात बेकायदेशीर नोंदी कमी करण्याची प्रक्रिया सुरू असतांना नंदुरबार येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार यांनी राज्य शासनाचे निर्बंध लागू असलेल्या शेतजमीन इतर अधिकारात त्रयस्थ व्यक्ती हिमंत धुडा पाटील रा. विखरण यांच्या नावाने पिक पाहणी क्षेत्र १ हेक्टर २० आर , या क्षेत्रातील सातबाऱ्यावर पिक पाहणी लावण्याचा अजब कारभार केला आहे. वास्तविक ही शेतजमीन दिवाणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 36 लागू असणारी शेतजमीन आहे, असा शिक्कामोर्तब झालेली असल्याने शेतजमीन आदिवासी कुटुंबाची आहे. शासनाकडून वेळोवेळी मिळणारे अनुदान देखील शेतकरी हिंमत ओंकार कोळी यांच्या कुटुंबाला मिळालेले असतांना इतर अधिकरात पीक पाहणी बाबत त्रयस्थ व्यक्ती हिमंत धुडा पाटील यांच्या नोंदी कश्या घेतल्या जाऊ शकतात. असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पीकपाहणी बाबत मार्गदर्शन मागविलेले होते. परंतु मार्गदर्शन प्रलंबित असतांना दरम्यान च्या काळात तहसीलदार हे रजेवर गेले. त्याचा फायदा घेऊन नायब तहसीलदार यांनी इतर अधिकारात पीक पाहणी बाबत नोंदी घेण्याचे आदेश पारित केलेले आहेत. म्हणून शासनाची फसवणूक करणारे सर्व दोषींवर कारवाई होऊन विधवा पत्नीच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे कामगार आघाडीचे जिल्हाअध्यक्ष संजय बगदे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनातून केली आहे.








