नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सुलतानपूर फाट्यावर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर महिला जखमी झाल्याची घटना घडली .याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय सुकलाल शितोळे ( वय २८) , रा.भासकी ता.पानसेमल हे दुचाकीने ( क्र.एम.पी .४६ एम ६५३४ ) त्यांची वहिणी निरुबाई प्रकाश शितोळे यांना शहादा येथे सोनोग्राफीसाठी घेवून जात होते . यावेळी शहादा – खेतिया रस्त्यावर सुलतानपूर फाट्याजवळ मालट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील मालट्रक ( क्र.एम.एच .३ ९ सी १ ९९ २ ) धोकादायकरित्या उभा केला होता . सदर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने अपघात घडला . घडलेल्या अपघातात संजय शितोळे यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . तसेच निरुबाई शितोळे यांनाही दुखापत झाली आहे . याबाबत प्रकाश सुकलाल शितोळे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ ( अ ) , ३३८ , ३३७ , २७ ९ , मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७ , १२२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोना.अजित गावीत करीत आहेत .