नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तसेच साक्री तालुक्यात शेतातून कापूस चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे.त्यांच्या ताब्यातून 6 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करून 8 गुन्ह्यांची उकल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 5 जानेवारी रोजी राहूल साहेबराव पाटील, रा. तलवाडे बुद्रुक, ता. यांचे वैंदाणे शेतशिवार गट नं.282/2 मधील पत्र्याच्या घरात साठवून ठेवलेला एकूण 42 हजार रुपये किंमतीचा 6 क्वींटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी त्यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीतांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
10 जानेवारी रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तलवाडे गावात राहणारा दिलीप भिल व त्याचे इतर साथीदारांनी मिळून वैंदाणे गावाचे शेतशिवारातून कापूस चोरीचा गुन्हा केला आहे. सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमीमधील संशयीतांस ताब्यात घेवून माहिती घेणे सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तलवाडे गावात जावून संशयीत दिलीप किशोर भिल रा. तलवाडे, ता. जि. नंदुरबार मूळ रा-पिक्चर टाकीजवळील भिलाटी साक्री, ता. साक्री यास अटक करून त्यास कापूस चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने सदर कापूस चोरीचा गुन्हा हा त्याचे इतर साथीदार ऋतीक ठाकरे, रा. तलवाडे, ता.जि.नंदुरबार, सुरेश माळीच, रा. कोकल, ता. साक्री, जगदीश माळचे, प्रमोद शिवदे सर्व रा. कावठी, ता. साक्री व त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने केल्याचा सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर तलवाडें गावातच राहणार संशयीत आरोपी ऋतीक ठाकरे याचा पथकाने शोध घेतला असता तो देखील तलवाडे गावात मिळून आला. पथकाने ऋतीक रमेश ठाकरे रा. तलवाडे, ता. जि. नंदुरबार यास अटक त्याने सुध्दा संशयीत आरोपी दिलीप भिल याने सांगितल्याप्रमाणेच हकीगत सांगितली.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील काही अंमलदार हे मिळालेल्या माहितीनुसार उर्वरीत संशयीत आरोपीतांचा शोध घेण्यासाठी तात्काळ साक्री तालुक्यातील कोकल व कावठी गावी रवाना झाले. तेथे जावून तपास पथकाने वरील संशयीत आरोपीतांचा शोध घेत असता वर नमूद संशयीत आरोपींपैकी सुरेश माळीच, रा. कोकल, ता. साक्री, जगदीश माळचे, प्रमोद शिवदे व अल्पवयीन हे मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता सुरेश रामलाल माळीच, रा. कोकल, ता. साक्री, जि. धुळे, जगदीश राजू माळचे, प्रमोद सुकदेव शिवदे सर्व रा. कावठी, ता. साक्री, यांना अटक करीत तपास पथकाने त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक विचारपुस केली व त्यांना बोलते केले. सदर संशयीतांनी गुन्हा करतांना वापरलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH-15-GV-3693 ) हिचा वापर केलेला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांनी ॲपे रिक्षा (क्र. MH-39-D-373) हिचा सुध्दा वापर करून नंदुरबार व साक्री तालुक्यातील वेगवेगळ्या शेतातून कापूस चोरी केल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने एकूण 6 लाख रुपये किंमतीची वरील महिंद्रा बोलेरो पिकअप व ॲपेरिक्षा अशी वाहने तपासकामी जप्त केली आहेत.
वर नमूद संशयीतांनी मिळून नंदुरबार व साक्री तालुक्यातील विविध ठिकाणावरून कापूस चोरी केलेल्या गुह्यांची माहिती खालीलप्रमाणे
23 डिसेंबर 2022 रोजी नंदुरबार तालुक्यातील तलवाडे बुद्रुक येथून एका शेतातून कापूस चोरी केली आहे. 5 नोव्हेंबर 2021 रोजी साक्री तालुक्यातील कासारे मालपूर फाट्यालगत एका शेताच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी साक्री तालुक्यातील कावठी गाव शिवारातील एका शेतातील कांद्याच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी साक्री तालुक्यातील कावठी गाव शिवारातील एका शेतातील कांद्याच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी साक्री तालुक्यातील आष्टाणे गाव शिवारातील एका शेतातील पत्राच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. 27 डिसेंबर 2022 रोजी साक्री तालुक्यातील आष्टाणे गाव शिवारातील एका शेतातील पत्राच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. 30 ऑक्टोंबर 2022 रोजी साक्री तालुक्यातील शेवाळी गाव शिवारातील एका शेतातील कांद्याच्या शेडमधून कापूस चोरी केली आहे. याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.वरील प्रमाणे ताब्यात घेण्यात आलेले एकूण 5 संशयीत आरोपीत व 2 अल्पवयीन यांच्याकडून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे 2 गुन्हे व साक्री पोलीस ठाणे, जि.धुळे चे 6 गुन्हे असे एकूण- 8 कापूस चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
ताब्यात घेण्यात आलेले संशयीत आरोपी दिलीप किशोर भिल, ऋतीक रमेश ठाकरे, सुरेश रामलाल माळीच, जगदीश राजू माळचे, प्रमोद सुकदेव शिवदे व 2 अल्पवयीन यांना गुन्ह्याचे तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आलेले असून सदर आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार राकेश वसावे, पोलीस नाईक बापु बागुल, सुनिल पाडवी, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण पोलीस अंमलदार शोएब शेख, राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली आहे.