म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथील जागृत देवस्थान श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रेस आज दि. सहा जानेवारीपासून सुरुवात होत असून यात्रेत हॉटेल्स खेळणे विविध वस्तू विक्रेते भांडी तसेच भाविक दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी ग्रामपंचायत काथरदे दिगर तसेच श्री जय मल्हार ट्रस्ट चे सर्व सदस्य लक्ष ठेवून आहेत.
काथरदे दिगर येथे गावाच्या मध्यभागी श्री. खंडेराव महाराज महादेव व मारुती असे त्रिवेणी संगम स्थान असलेले पुरातन मंदिर होते.आज या मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आलेली आहे श्री खंडेराव महाराज भाविकांचे जागरूक स्थान म्हणून ओळखले जातात दरवर्षी शुद्ध पौर्णिमेला श्री खंडेराव महाराजांची मोठी यात्रा भरत असते यात्रेत बारा गाड्यांची लागवड प्रसिद्ध आहे श्री खंडेराव भक्त भगत 200 ते ते 400 फुटापर्यंत बारा गाड्यांची लागवड जय मल्हारच्या जयघोषात दरवर्षी ओढतात भक्ताकडून लागवड होणे हा एक दैवी चमत्कार मानला जातो. यात्रेच्या दिवशी आलेले भाविक खंडेराव महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची खरेदी करत नाही या यात्रेत श्री.खंडेराव महाराजांना मानलेले नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते विविध आजार बरे व्हावेत मुलं बाळे व्हावीत तसेच कुटुंबावर आलेले संकट दूर व्हावे म्हणून महाराजांसमोर भाविक विविध नवस बोलून जातात या नवसामध्ये तुरीच्या सुकलेल्या काड्यांमध्ये पाच सात 11 21 नारळ बांधून वाजत गाजत नवविवाहित जोडपे नातेवाईकांस गर्दीने येऊन मंदिरात श्री. खंडेराव महाराजांना अर्पण करतात तसेच गूळ, केळी,पेढा, लाडू आदींच्या तुला करून नवस फेडला जातो.
रविवार हा खंडेराव महाराजांच्या वार असल्याने दर रविवारी भरण्याच्या कार्यक्रम येथे होत असतो खोबऱ्याचे वाटी भंडारा हळद व गहू तांब्याच्या कळस त्यात पवित्र मानलेले उदक पाणी कापुरवडी एवढे साहित्य घेऊन तळी भरले जाते. येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणेने कार्यक्रम पार पाडला जातो.यात्रेच्या दिवसाच्या अगोदरच्या रविवारी श्री खंडेराव महाराजांना समर्पित गोंधळाचा कार्यक्रम होतो. सातपुडा पर्वत भाग तसेच बाजूच्या मध्य प्रदेश गुजरात राज्यातील जवळचे खेडे तसेच खानदेशातील भाविक या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर यावर्षी गावात यात्रेचे आयोजन करण्यात आलेले असून ग्रामस्थ व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यात्रेत येणारे भाविक व्यापारी यांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत तसेच श्री जय मल्हार ट्रस्ट यांच्यामार्फत योग्य प्रकारे नियोजन केले जात आहे. यात्रेत मनोरंजनासाठी तमाशा मंडळ देखील दरवर्षी हजेरी लावतात ग्रामीण भागात आजही यात्रांना मोठ्या प्रमाणात महत्त्व असून ग्रामीण भागातील महिला पुरुष बालके मोठ्या संख्येने यात्रेत गर्दी करतात यावर्षी यात्रेत विविध साहित्य विक्रेते व्यापारी तसेच तमाशा मंडळ यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष व सरपंच गुलाबसिंग गिरासे, ट्रस्टचे उपाध्यक्ष निंबा दाजी गिरासे, सचिव भीमसिंह गिरासे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन व सदस्य जय मल्हार ट्रस्टचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे. संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या यात्रेत मोठ्या संख्येने भावी हजेरी लावतात.