नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कुढावद येथील एका संस्थाचालकाला
मानव विकास मंत्रालय दिल्ली येथे वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत मॉडेल स्कूल सुरु करण्याची मंजूरी मिळवून देण्याचे आमीष देत तब्बल ६५ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील कुढावद येथील अशोक हिरालाल पाटील व साक्षीदार यांना बन्सीलाल सखाराम सोनवणे , अमोल बन्सीलाल सोनवणे दोघे रा . श्रीराम कॉलनी , वाडीभोकर रोड धुळे व दीपक तुकाराम देवरे रा.महादेव हौसिंग सोसायटी , त्रिमूर्ती चौक नाशिक यांनी मानव विकास मंत्रालय दिल्ली येथे वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले . तसेच अशोक पाटील व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन जय देवमोगरा माता बहुउद्देशिय संस्था कुढावद ता.शहादा या संस्थेच्या नावाने मानव विकास मंत्रालय दिल्ली येथून मॉडेल स्कूल सुरु करण्याची मंजूरी मिळवून देतो असे सांगितले . यासाठी अशोक पाटील व साक्षीदार यांच्याकडून तिघांनी संगनमत करुन ६५ लाख रुपये घेत शाळेची मंजूरी न मिळवून देता फसवणूक केली . अशोक पाटील यांनी वेळोवेळी पैशांची मागणी केली असता तिघांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली . याबाबत अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ४२ ९ , ४२० , ४६५ , ४६८ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल बिहाडे करीत आहेत .