म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील दामळदा येथील श्री. तारकेश्वरी विद्या प्रसारक मंडळ संचालीत माध्यमिक विद्यालय दामळदा मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनींना सायकल वाटप करण्यात आले.
शाळेपासून दोन – पाच किलोमीटरच्या अंतरावरुन कुरंगी, भोरटेक, चिखली, ओझर्टा, तिधारे या गावांतून येणाऱ्या सुमारे ४५ विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप संस्थेचे चेअरमन गणेश जी. पाटील, गट शिक्षणाधिकारी डी. टी. वळवी, असलोद केंद्राचे केंद्र प्रमुख एल. टी. परदेशी, पं. स. सदस्या संगीता पाटील, मुख्याध्यापिका मनीषा पाटील, दामळदाचे सरपंच हरेराम मालचे, भोरटेकचे सरपंच मिनाबाई पवार, दामळदाचे उपसरपंच डॉ. विजय चौधरी, पत्रकार कल्पेश राजपूत, योगेश पाटील, लहू सोनवणे, परमेश्वर सोनवणे, जयसिंग पवार आदींचा उपस्थितीत सायकलीचे वाटप झाले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी डी. टी. वळवी म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षण घेतले पाहिजे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जगाच्या पाठीवर उत्तुंग भरारी घ्याव्यात, मुली शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे शासनाचा निदर्शनास आल्याने मानव विकास अंतर्गत मुलींना मोफत सुविधा देण्यात येत आहे. मुलींसाठी मानव विकास अंतर्गत फ्री पास सुविधा ही उपलब्ध करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांनीना या सुविधा मिळत नसल्याकारणाने व शाळेपासून दोन – पाच किलोमीटर अंतराच्या आत असणाऱ्या मुलींना शाळेत येण्यास उशीर लागत असल्याने व काही येत नसल्याने या विद्यार्थिनींना या योजनेअंतर्गत सायकलीचे वाटप होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी तर आभार सुनीता बागुल यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








