म्हसावद l प्रतिनिधी
शहादा डोंगरगाव रस्त्याजवळील भाऊ तात्या पेट्रोल पंप समोरील चौफुलीवर मोटर सायकल व माल ट्रकचा भीषण अपघातात नवविवाहित तरुण ठार झाल्याची घटना 31डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान घडली.
या अपघातात मोटर सायकल ( क्र. MH-39-L-0260) वर नव विवाहित तरुण शंकर विहार कडे जात असताना माल वाहू ट्रक ( क्र. MP -06-HC-1649) भरधाव वेगाने येत असताना चालक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत गाडी चालवत होता.या अपघातात मोटर सायकल चालक प्रदिपकुमार उर्फ राहुल प्रल्हाद भाई पटेल (वय- 28) रा निझर जि.तापी यांचा उपचारा दरम्यान मृत झाले.चालक मात्र तेथून फरार झाला. या ठिकाणी रस्ते महामंडळाकडून गतिरोधक राहिले असते तर कदाचित ट्रक ची गती कमी राहिली असती व नव विवाहित तरुण वाचला असता परंतु प्रशासन अजून किती बळी घेणार असा संतप्त सवाल यातून उपस्थित होत आहे.
तीनच दिवस लग्नाला झाले असल्याने नवविवाहित तरुणी विधवा झाल्याने कुटुंबावर एकच शोककळा पसरली आहे.दरम्यान, मयत प्रदीपकुमार पटेल हे कॅनडा येथे नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच ते स्वत:च्या लग्नासाठी गावी निझर येथे आले होते. अवघ्या तीन दिवसांपूर्वी त्यांचा कवठळ (ता.शहादा) येथे विवाह झाला होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. विवाहानंतर ते पावागढ येथून कालिकादेवीचे दर्शन घेऊन नुकतेच शहादा येथे मामाच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी आले असता क्रूरकाळाने त्यांच्यावर नववर्षाच्या पूर्वसंध्येला घाला घातला.
या अपघातात प्रशांत पुरुषोत्तम पटेल (वय ३० ) रा. दहिंदुले ता.नंदुरबार गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत शहादा पोलीस ठाण्यात तिरुपती तुकाराम पाटील वय 41 धंदा नोकरी उपकार्यकारी अभियंता महावितरण कंपनी तळोदा तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार हल्ली मुक्काम मंगलमूर्ती नगर शहादा यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 304(अ) 279 337 338 427 सह मोटर वाहन कायदा कलम 184 134 187 प्रमाणे ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास परी पोसई छगन चव्हाण हे करीत आहेत.








