नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात ३० ते ३१ डिसेंबर दरम्यान जिल्हा पोलीसांतर्फे विशेष मोहिम राबविण्यात आली असुन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या आदेशान्वाये मद्यपी वाहन चालकाविरुध्द् दोन दिवसांत १४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहादरम्यान काही अति उत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करतात. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. अशा इसमांविरुध्द् तसेच दारु पिऊन वाहन चालविणार्यांविरोधात ३० ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत विशेष मोहिम राबवून कारवाई करण्या बाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी संपूर्ण जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने संपुर्ण नंदुरबार जिल्हयात दोन दिवसात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान १४१ वाहन चालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांचे विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे- ५, उपनगर पोलीस ठाणे-२३, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे- ८, नवापूर पोलीस ठाणे- १४, विसरवाडी पोलीस ठाणे-१०, धडगांव पोलीस ठाणे- ५, म्हसावद पोलीस ठाणे- ५, सारंगखेडा पोलीस ठाणे-६, अक्कलकुवा पोलीस ठाणे- ११, तळोदा पोलीस ठाणे- ८, मोलगी पोलीस ठाणे-३ व शहर वाहतूक शाखा २४ गुन्हे असे एकुण १४१ गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणार्यांविरुध्द् राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात येणार असुन लवकरच त्यांचेवर परवाने (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येईल.नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून माहे जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या ३९१ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून ३५८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. दारु पिऊन वाहन चालवितांना दुचाकीस्वार व चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन परवाने (लायसन्स) निलंबित करणेची कारवाई भविष्यातही अशीच सुरु राहील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.








