म्हसावद l प्रतिनिधी
दि. 4 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत पाली राजस्थान येथे 18 व्या राष्ट्रीय जांबोरीचे आयोजन करण्यात आले असून या जांबोरी मध्ये देशातील विविध राज्यातील 35 हजार विद्यार्थी सहभागी होत आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील 2 हजार 200 विद्यार्थी सहभागी होत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून कमला नेहरू कन्या विद्यालय नंदुरबार,श्रीमती डी. आर.हायस्कूल नंदुरबार, वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय शहादा, श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवड या शाळांमधील 18 स्काउट्स आणि 18 गाईड्स सहभागी होत आहेत. जांबोरीच्या उद्घाटन प्रसंगी भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत.
या जांबोरीत साहसी व आनंदमयी खेळ राज्यातील खाद्य संस्कृती सांस्कृतिक देवाण-घेवाण आजादी का अमृत महोत्सव,विचारांची देवाण-घेवाण, समुदाय विकास उपक्रम, संचलन, लोकनृत्य, ,कॅम्प क्राफ्ट, कॅम्प फायर,पायोनीरिंग प्रकल्प, शारीरिक कसरती लोकनृत्य, बँड पथक इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील सहभागी स्काऊट्स आणि गाईडस लोकनृत्य शेकोटी कार्यक्रम, स्टेट एक्जीबिशन, स्टेट डे एक्स्पोझिशन,शोभायात्रा आणि रांगोळी यामध्ये नंदुरबारची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती सादर करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन आणि नियोजन नंदुरबार भारत स्काऊट्स आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा संघटक गाईड कविता वाघ, जिल्हा संघटक स्काऊट सुधाकर साखरे यांनी केले आहे. स्काऊट मास्तर दिनेश वाडेकर, वसंत पावरा,गाईड कॅप्टन सुषमा फुलंब्रीकर, चेतना वाघ आणि कॉन्टिजंट लीडर संकेत माळी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
आज जांबोरीस जाणाऱ्या स्काऊट्स आणि गाईड्स यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त सतीश चौधरी, शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा जिल्हा आयुक्त स्काऊट मच्छिंद्र कदम,नगराध्यक्षा तथा जिल्हा आयुक्त गाईड रत्नाताई रघुवंशी, सर्व कार्यकारणी सभासद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.








