नंदुरबार| प्रतिनिधी
नवापूर शहराजवळील खेतेश्वर रायका हॉटेलजवळ पंक्चर काढणाऱ्या तरुणाला ट्रकने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अशोक रामकरण मेघवाल (रा.पुंदलुगाव ता.मेडता सिटी नागोर राजस्थान) हे त्यांच्या ताब्यातील मालट्रक (क्र.आर.जे.२७ जीडी ३७७७) नवापूर शहराजवळील रायका हॉटेलजवळील रस्त्याजवळ धर्मराम प्रतापराम मेघवाल यांच्याकडून पंक्चर काढत होते. यावेळी एका अज्ञात ट्रक चालकाच्या त्याच्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रक चालवून पंक्चर काढणाऱ्या धर्मराम मेघवाल यांना जबर धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत अशोक मेघवाल यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १७७, १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुमानसिंग पाडवी करीत आहेत.








