नंदूरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातील निंभोरा शिवारातील केदारेश्वर खांडसरी येथे बैलाने हिसका दिल्याने ऊसाने भरलेल्या बैलगाडीवरील बालकाचा तोल गेला व बैलगाडीचे चाक अंगावरून गेल्याने दहा वर्षीय बालकाच्या मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात राज्यातील निंभोरा शिवारातील केदारेश्वर खांडसरी येथे नारायण सरदार जाधव रा.वसंतवाडी ता.पारोळा जि.जळगाव, ह.मु.केदारेश्वर खांडसरी हे आपल्या दोन मुलांना घेऊन पत्नीसह ऊस तोडणीचे काम करतात. ३१ डिसेंबर रोजी देखील भल्या पहाटे त्यांनी ऊस तोडणीसाठी मिळालेल्या शेत शिवाराचा पत्ता घेऊन शेत गाठले.
दिवसभर ऊस तोडणी करून बैलगाडीमध्ये ऊस भरला. त्यासाठी दोन्ही मुले विक्रम जाधव (वय १३) व विकी जाधव (वय १०) यांनी आईसह ऊसतोड केली व गाडी भरण्यास मदत केली.
दोन्ही मुलांपैकी लहान मुलगा विकी जाधव बैलगाडीवर असताना अचानक बैलांनी बैलगाडीला हिसका दिल्याने विकी जाधव याचा तोल जाऊन तो खाली जमिनीवर पडला. त्याचवेळी त्याच्या अंगावरून बैलगाडीचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
त्या अवस्थेत शेतमालक पुंडलिक मोरे व कुटूंबियांनी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे विकी जाधव यास दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मयत घोषित केले. या घटनेत ऊस तोडणीसाठी आलेल्या कुटुंबाच्या दहा वर्षीय मुलगा गमावला गेल्याने ऊस तोडणीचे विदारक चित्र सर्वांच्या समोर उभे राहिले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.








