नंदुरबार l प्रतिनिधी
आज दि.३१ डिसेंबर रोजी सन २०२२ वर्ष संपून उद्या दि.१ जानेवारी रोजी नवीन वर्षाला सुरूवात होणार आहे.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यादरम्यान जल्लोषात व उत्साहात कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारी म्हणून विविध उपायोजना करण्यात आल्या असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे बस स्थानक, रेल्वे स्टेशन, गर्दीचे ठिकाण व इतर महत्वाच्या ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करण्यात येणार आहे.याशिवाय मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिला.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या इसमांविरुध्द् तसेच दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द् विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठवून त्यांचेवर परवाने निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसेच बस स्थानक, रेल्वे स्थानक, बाजार पेठ आदी गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरी, चोरी, पाकिटमार अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून साध्या वेषातील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड काढण्याच्या प्रकारांना थांबविण्यासाठी टवाळकी करणाऱ्या युवकांविरुध्द् निर्भया पथकांकडून कठोर कायदेशीर कारवाई येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहात काही समाज कंटकांकडून अनुचित प्रकार होणार नाहीत, यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्स ॲप, ट्विटर व इतर सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ, किंवा पोस्ट प्रसारीत करणाऱ्यांविरुध्द् पोलीस दलातील सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
नवीन वर्षाच्या बंदोबस्तासाठी पोलीस दलाकडून ९ पोलीस निरीक्षक, ३१ सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, ४५६ पोलीस अंमलदार असा एकुण ४९९ पोलीस अधिकारी व अंमलदांराचा बंदोबस्त पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आलेला आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करतांना कोणीही दारु पिऊन वाहन चालवू नये. दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितासदेखील धोकादायक आहे. नागरीकांनी स्वत:चे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी आढळून आल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करुन परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच नवीन वर्षाचे स्वागत शांततेत व उत्साहात साजरे करावे.
पी.आर.पाटील, पोलीस अधीक्षक,नंदुरबार








