नंदुरबार | प्रतिनिधी-
जिल्हा पुरवठा अधिकारी व स्वतःच्या नावाने रेशन दुकानदाराकडून 29 हजाराच्या लाचेची मागणी करणार्या तहसिल कार्यालयातील गोडावून किपरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनरद ता.शहादा येथील मुळ शेतकरी राजेंद्र भिका पाटील हे पाच वर्षापासून संत मिराबाई महिला बचत गट या नावाने रेशन दुकान चालवित आहेत. दि. २१ डिसेंबर रोजी रेशन दुकानची पाहणी करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार व त्यांच्या सोबत गोडावून किपर दिनेश शामराव रणदिवे हे आले होते.
पाहणी करत असतांना रेशन दुकानाच्या बाहेर बोर्ड लावलेला नाही, रेकॉर्ड व्यवस्थीत ठेवलेले नाही, तुमची धान्य वितरण करण्यासाठी पद्धत बरोबर नाही, धान्य व्यवस्थीत ठेवलेली नाही असे सांगून व्हीजीट बुकात नोंद करत व्हीजीट बुक ताब्यात घेतले.
त्यानंतर रणदिवे यांनी पाटील यांना साहेबांचे काय आहे ते करुन टाका, माझे पाच हजार व साहेबांचे ३० हजार रुपये असे ३५ हजार रुपये लागतील, असे सांगून ३५ हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क केला.
दरम्यान तडजोडीअंती साहेबांच्या नावाचे २५ हजार व स्वतःसाठी ४ हजार अशी एकुण २९ हजार रुपये लाचेची मागणी केली. म्हणून शहर पोलीस ठाण्यात रणदिवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश चौधरी करीत आहेत.








