नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे जिल्ह्यातील मयत पोलीस अमलदाराच्या कुटुंबीयांना मदत निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील विसरवाडी पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस हवालदार विश्वास मोतीराम गावीत यांचे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुर्देवी निधन झाल्याने मयत पोलीस अंमलदारांच्या कुटुंबासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना केले होते.
पोलीस अधीक्षकांच्या आवाहनास जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून मयत पोलीस हवालदार विश्वास मोतीराम गावीत यांचे परिवाराकरीता ४ लाख ६१ हजार रुपये एवढा मदत निधी अल्प काळात जमा केला. पोलीस अधीक्षक यांनी सर्वप्रथम स्वतःतर्फे मदतनिधी दिला. पोलीस दलाकडून जमा करण्यात आलेल्या मदत निधीचा धनादेश मयत पोलीस हवालदार विश्वास मोतीराम गावीत यांचे कुटुंबीयांना पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्रदान करण्यात आला.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मयत पोलीस अंमलदारांच्या कुटुंबीयांच्या काही अडचणी असतील तर त्या देखील लवकरात लवकर सोडविल्या जातील असे सांगितले.नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपल्याच कुटुंबातील सहकारी सदस्याचे दुर्देवी निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना केलेल्या मदतीच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलीस दल हे शिस्तीचे खाते असून बेशिस्त वर्तन करणारे किंवा पोलीस दलाची प्रतीमा मलीन करणार्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर वरिष्ठ अधिकार्यांकडून कारवाई केली जाते, परंतु पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्याच सहकारी सदस्याच्या दुर्देवी निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना स्वेच्छेने केलेल्या मदतीमुळे दुःखद प्रसंगातून जाणार्या पोलीस अंमलदारांच्या कुटुंबीयांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.








