प्रकाशा | प्रतिनिधी –
प्रकाशा गावाच्या विकासाकरिता पाणी पुरवठा स्वच्छता विभाग जल जीवन अभियानांतर्गत सुमारे पावणे चार कोटी रुपयांच्या जलजीवन योजनेचे भुमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ.हीना गावित उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, जि.प.सदस्या भारती भिल, माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, लोकनियुक्त सरपंच राजनंदिनी राजेंद्र भिल, संत दगाजी बापू ट्रस्ट अध्यक्ष मोहन चौधरी,माजी सरपंच रंग्या भिल, माजी सरपंच अमृत ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशा बसस्थानक परिसरात आमसभा घेण्यात आली.
यावेळी खा.डॉ.हीना गावित म्हणाल्या, जल जीवन मिशन अंतर्गत आपल्या देशात २०२४ पर्यंत प्रत्येक राज्यातील जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनसाठी प्रकाशा येथे सुमारे पावणे ४ कोटींचा निधी आराखडा मंजूर करण्यात आला आहे. प्रकाशा गावाकरिता वॉटर ट्रीटमेंट फिल्टर प्लांटसाठी आगामी काळात निधी प्राप्त करून देऊ अशी ग्वाही दिली, असेही डॉ.हिना गावित म्हणाल्या.
डॉ.सुप्रिया गावीत यांनी सांगितले, या योजनेद्वारे घराघरात शेवटच्या वस्तीपर्यंंत पाणी पोहचवले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या सरकार विकास निधीतून झपाट्याने कामे केली जातील, गावातील, गल्लीबोळामधील सर्व रस्ते पक्के होतील, विकास योजनेतून कोणीही वंचित राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी ना.डॉ.विजयकुमार गावित म्हणाले, येत्या २०२४ पर्यंत प्रत्येक घटकातील गरजू व्यक्तींसाठी निकष यादी असो वा नसो डी यादी सोडून त्यांना विविध योजनांतून घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल, सर्वांचे घरकुल मंजूर करण्यात येतील, असे ते म्हणाले.
याप्रसंगी माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी सांगितले, जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजूरी मिळाली आहे. २०५३ पर्यंत आणखीन गावाची लोकसंख्येत मोठी भर पडणार आहे, शासनाने एकच पाण्याची टाकी उपलब्ध मंजूर केली, मात्र पूर्ण गावाला पाणी पुरवठा योजना अपुरी पडणार आहे. आजची प्रकाशा गावाची लोकसंख्या दहा हजाराचा वर गेली आहे, शिवाय गावाला लागून ग्रामपंचायत हद्दीत नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत, थेट पाच सात किलोमीटर पर्यंत गावाची व्याप्ती वाढली आहे, हल्लीचे प्रमाण धरून शासनाने परत एक पुरवठा प्रकल्प जलयोजनेसाठी परवानगी द्यावी असा लेखी प्रस्ताव देऊन मागणी केली.
दरम्यान, ऍपेरिक्षा चालक, मालक, संघटनेमार्फत यांनी आरटीओ प्रशासन नाहक त्रास देत असल्याबाबत विजयकुमार गावित यांना निवेदन देण्यात आले. पाणी पुरवठा योजना संक्षिप्त पाण्याचा स्रोत गोमती नदी समाविष्ट गावे लागून उपनगरे व २०५३ पयर्ंत वाढणारी लोकसंख्या १७८५० हल्ली ८५४५ आहे प्रति एका नागरिकास ५५ लिटरचे प्रमाण राहील, पाणी पुरवठा वितरण २३.५ किलोमीटर पर्यंत पाईपलाईन टाकली जाईल. २२.५ मीटर उंचीचे जल कुंभ उभारण्यात येईल या कामासाठी अंदाजे ३ कोटी ७८ लक्ष रुपये खर्च आराखडा तय्यार करण्यात आला आहे, असे डॉ.गावित यांनी सांगितले.
कार्यक्रमास ईश्वर पाटील, माजी उपसरपंच रफिक खाटीक, फारुख खाटीक, सुदाम ठाकरे, भावडू ठाकरे, पंडित भोई, दिलीप पाटील, राम बाबा, पं.स.सभापती विरसिंग ठाकरे, बीडीओ राघवेन्द्र घोडके, जि.प.सभापती हेमलता शितोळे, नंदलाल गिरीधर पाटील, ग्रामसेवक बी.जे.पाटील, तलाठी धर्मदास चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन शिक्षक भटू सामुद्रे यांनी केले.








