नंदुरबार| प्रतिनिधी
कापसाला भाव कमी मिळाल्याने सुमारे १०० ते १५० शेतकर्यांनी आज नंदुरबार तालुक्यातील पळाशी फाटयाजवळ रास्तारोको आंदोलन केले. यावेळी ७ हजार ५०० च्या वर भाव देण्यात आल्याने दुपारून २ वाजेनंतर कापसाचा लिलाव सुरू झाला. यावेळी मोठया प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झालेली दिसली.

नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कापूस खरेदी केंद्रात कापूस खरेदीची सुरूवात करण्यात आली आहे. शुक्रवारी याठिकाणी कापसाला प्रति क्विंटल ८ हजार ४०० रूपये दर मिळाला होता. आज पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात सुमारे १०० ते १५० वाहनातून शेतकरी कापूस विक्रीसाठी दाखल झाले होते. यावेळी कापसाला ७ हजार २०० रूपये भाव प्रतिक्विंटल मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी संतप्त शेतकर्यांनी नंदुरबार निझर रस्त्यावरील पळाशी फाटयावर रास्तारोको आंदोलन केले. दोन दिवसापुर्वी ८ हजार ४०० भाव असतांना दोन दिवसातच हजार ते १२०० रूपयांचा दर कमी झाल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या.
शासनाने ८ हजाराच्यावर दर निश्चित केलेला असतांना कापूस इतक्या कमी किंमतीत का खरेदी करण्यात येत असल्याचा सवाल केला. यावेळी कापूस खरेदी केंद्राचे अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी शेतकर्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कापसाचा भाव आम्ही ठरवत नसतो, वरील कार्यालयातून आम्हाला ज्या दिवशी जो भावाचा आदेश येतो. त्या भावाने आम्ही कापूस खरेदी करीत असतो. चर्चेनंतरही शेतकर्यांचे समाधान झाले नाही. शेतकर्यांचे आंदोलन सुमारे दिड तासाचावर सुरू होते. यावेळी पोलीसांनी चर्चा करीत असतांना वाहनांना जाण्यासाठी जागा करून दिली.
यावेळी दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. जोपर्यंत कापसाला समाधानकारक भाव मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल. असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला. यावेळी ७ हजार ५०० च्या वर भाव देण्यात आल्याने दुपारून २ वाजेनंतर कापसाचा लिलाव सुरू झाला. दुपारून २ वाजेनंतर कापसाचा लिलाव सुरू झाला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.








