चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर
पालीताना श्री शत्रुंजय महातीर्थ येथे प्राचीन जनपादुका खंडीत केल्याबाबत तसेच जैन समाजाचे पवित्र सर्वोच्च धार्मिक स्थळ सम्मेद शिखरजी या भागास झारखंड सरकारद्वारा पर्यावरण व पर्यटन स्थळ बनविण्यास प्रखर विरोधाबाबत दि.२१ डिसेंबर रोजी तळोदा येथील समस्त जैन समाजाच्या वतीने आपली सर्व प्रतिष्ठान बंद ठेवून मूकमोर्चा काढून स्मारक चौकात जाहिर निषेध व्यक्त करून तळोदा श्री जैन संघातर्फे अध्यक्ष तथा सर्व समाज मंडळीतर्फे तळोदा यांच्या वतीने तहसिलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच पालीताना श्री शत्रुंजय महातीर्थात काही असामाजिक संघटनेद्वारा अति प्राचीन जनपादुकांची जैन मंदिरात प्रवेश करुन तोडफोड करून खंडीत करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण भारतात जैन धर्मियांच्या धार्मिक भावनांना ठेस पोहचली आहे. तसेच अद्यापही स्थानिक अधिकाऱ्यांकडून नमूद घटनेची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. भविष्यात जर अशाच घटना घडत राहिल्यास तीर्थक्षेत्र पालीताना सुरक्षित राहणार नाही. त्यामुळे या कृत्याची त्वरित दखल घेऊन चौकशी व्हावी.
तसेच भारतात व जगभरात जैन धर्म हा अल्पसंख्यांकात आहे. जैन धर्माचे पवित्र धार्मिक स्थळ सम्मेत शिखरजी जगविख्यात आहे. सदरचे धार्मिक स्थळ हे जैन धर्मियांचे सर्वोच्च धार्मिक स्थळ आहे. संपूर्ण भारतात व जगभरात सदर धार्मिक स्थळ प्रचलित आहे. जैन धर्मासह इतर धर्मीय लोकांचे देखील श्रध्दास्थान असलेले धार्मिक स्थळ आहे. नुकतेच झारखंड सरकारने सदरील पवित्र जैन स्थळावर अनुशंसा केंद्रीय वन मंत्रालयद्वारा तेथील वन्यजीव अभयारण्याचा एका भागास पर्यावरण व पर्यटन स्थळ बनविण्याचे ठरविलेले आहे. या सदरच्या कृत्याने संपूर्ण जैन समाज आक्रोश व नाराज झाला असून सदरील सरकारचा निर्णयास सर्वत्र जैन संघाकडून प्रखर विरोध नोंदविण्यात आला आहे. झारखंड सरकारचा सदरचा निर्णयाने श्री जैन संघ तळोदा देखील विरोध करीत असून आमचा प्रखर विरोध आहे.
विशेषतः श्री सम्मेद शिखर आम्हा जैन धर्मायांसाठी सर्वोच्च पवित्र असे स्थळ आहे. तेथे वीस तीर्थकार तथा अनंत संतांचे मोक्ष स्थळ आहे. यास पर्यटन स्थळ घोषित केल्यास रहिवासासाठी हाॅटेली आदींचे निर्माण होईल, मांस-मदीरा सेवन याने तेथील पवित्रता भंग होईल तसेच धार्मिकता जोपासली जाणार नाही व सर्व जैन धर्मियांच्या धार्मिक भावनांना ठेस पोहचून त्यांच्या भावना दुखावल्या जातील. म्हणून केंद्र सरकारला विनम्र निवेदन आहे की, जैन समाजाच्या भावनांकडे पाहून सरकारने घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा जैन समाज अहिंसाद्वारे संपूर्ण भारतात भारतवर्ष दरम्यान सादगीपूर्ण आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी तळोदा जैन समाज अध्यक्ष प्रविणकुमार जैन, उपाध्यक्ष राजेंद्र कोचर, सचिव महावीर जैन, कांतीलाल पारख, कालुभाई देसाई, गौतम जैन, किर्तीकुमार शाह, गौतम बोथरा, डाॅ.पंकज जैन, ॲड.अल्पेश जैन, कुमारपाल जैन, प्रकाश कोचर तसेच भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, आनंद सोनार आदींसह तळोदा जैन समाजाचे पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.








