नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथील श्री. सुघोषाघंट मंदिरात झालेली चोरी 24 तासात उघड करीत आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 19 रोजी रात्री 9 वा ते २० डिसेंबर रोजीचे सकाळी 5 वाजेच्या दरम्यान शहादा शहरातील श्री जिवनकुशल सुरी जैन, दादावाडी ट्रस्टचे श्री. सुघोषाघंट मंदिराचे दक्षिण भागातील दरवाज्याचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करून मंदिरातील 7 दान पेट्या उचलून मंदिराच्या पाठीमागे घेवून जावून त्या पेट्यांचे कुलूप कुठल्यातरी हत्याराने तोडून त्यामधील 1 लाख 30 हजार रूपये रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोटयाने चोरून नेले होते. त्याबाबत गणेश श्रीकृष्ण देशपांडे रा. जैन मंदिर दादावाडी डोंगरगाव रोड, शहादा यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना ही नागरिकांच्या धार्मिक भावनेशी निगडीत असल्याने नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार, राजन मोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी शहादा पोलीस स्टेशन यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हयांतील आरोपीतांना तात्काळ अटक करुन गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत व आरोपीतांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सी. सी. टी. व्ही. तपासून अज्ञात आरोपीतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, परंतु CCTV फुटेज अस्पष्ट असल्यामुळे आरोपीतांची निश्चित ओळख होत नव्हती.
नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना 21 डिसेंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, शहादा शहरातील घंटा मंदिर येथे झालेली चोरी ही मध्यप्रदेश राज्यातील खरगोन जिल्हयातील सनावद येथील सराईत गुन्हेगार सुल्तानशेख व सुरज ठाकुर यांनी मिळुन केलेली आहे. तसेच दोन्ही आरोपीतांवर यापुर्वी देखील मालमत्तेविरुध्द गुन्हे दाखल आहेत. सदरची माहीती नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून संशयीत सुल्तान शेख व सुरज ठाकुर यांना ताब्यात घेवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन मध्यप्रदेश राज्यातील सनावद जिल्हा खरगोन येथे रवाना केले. तपास पथकाने मध्यप्रदेश राज्यातील सनावद गाठून दोन्ही आरोपीतांचा शोध घेतला असता, दोन्ही आरोपी हे सराईत व अत्यंत चालाख असल्यामुळे ते सहज कोठे बाहेर येत नाहीत व आपले अस्तित्व लपवून वेषांतर करुन फिरत असतात. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपींचा नेमका ठावठिकाणा समजून येत नव्हता. स्थानिक गुन्हेच्या पथकाने अत्यंत कमी वेळेत मध्यप्रदेश सारख्या राज्यात बातमीदारांचे जाळे तयार करुन आरोपी सुल्तान शेख व सुरज ठाकुर यांचे राहण्याचे निश्चित ठिकाण शोधून काढण्यात यश आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपींच्या घराच्या आजू-बाजूला वेषांतर करुन सापळा रचला व त्यांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पाळत ठेवली, परंतू 20 डिसेंबर रोजी संपूर्ण सायंकाळ व रात्र जावून कोणत्याही प्रकारच्या संशयीत हालचाली दिसून आल्या नाहीत. 21 डिसेंबर रोजीच्या पहाटे 4 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपीतांच्या घरात प्रवेश करतांना दोन संशयीत इसम दिसून आले. पथकाने अत्यंत सावधगीरीने दोन्ही संशयित आरोपीतांवर झडप घालून त्यांना शिताफिने सुल्तान शेख रशिद शेख मुळ रा- लाचीवाडा मोठी मशिदचे बाजुला रुम नं. 3 दाहोत ता. जि. दाहोत (गुजरात) हल्ली मुक्काम सनावद, टिनची ग्राउंड, ता. सनावद, जि. खरगोन (मध्यप्रदेश) व सुरज नवलसिंग ठाकूर, मूळ रा. अकोला, ता. जि. अकोला (महाराष्ट्र) हल्ली मुक्काम. सनावद, काठीबेडी, ओंकारेश्वर रोड, एसबीआय एटीएम शेजारी, ता. सनावद, जि. खरगोन (मध्यप्रदेश) यांना अटक केली.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयीतांना शहादा येथील मंदिरात झालेली चोरी व मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी दोघांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले व गुन्हा करतांना मंदिराच्या दानपेटीमधून चोरी केलेले पैसे त्यांच्या जवळ असलेल्या बॅगेत असल्याचे सांगितले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुल्तान शेख रशिद शेख याच्या बॅगेतून 41 हजार 310 रुपये रोख रक्कम व सूरज नवलसिंग ठाकूर याच्या बॅगेतून 39 हजार 800 रक्कम असा एकूण 81 हजार 310 रूपये रोख रक्कम त्यांच्याकडे मिळून आल्याने ते गुन्ह्यात जप्त केले आहे.
वरील दोन्ही संशयीत आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून त्यांना अधिक विश्वासात घेवून सखोल विचारपूस करता त्यांनी मागील काही काळात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या मंदिरातून अशाच प्रकारची चोरी केलेली असल्याचे सांगितले. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची माहिती खालील प्रमाणे-
मनमाड पोलीस ठाणे, जि. नाशिक ग्रामीण, मनमाड पोलीस ठाणे, जि. नाशिक ग्रामीण, चांदवड पोलीस ठाणे, जि. नाशिक ग्रामीण, जूने शहर पोलीस ठाणे, जि. अकोला, फ्रेजरपुरा पोलीस ठाणे, जि. अमरावती, फ्रेजरपुरा पोलीस ठाणे, जि. अमरावती, फ्रेजरपुरा पोलीस ठाणे, जि. अमरावती, सिव्हिल लाईन पोलीस ठाणे, जि. अकोला, सिव्हिल लाईन पोलीस ठाणे, जि. अकोला, सिव्हिल लाईन पोलीस ठाणे, जि. अकोला, आडगाव पोलीस ठाणे नाशिक आयुक्तालय , मंडलेश्वर पोलीस ठाणे जि. खंडवा (म.प्र राज्य) ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही संशयीत आरोपीतांकडून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश राज्यातील एकुण 12 गुन्हे उघडकीस आल्याने त्यांना मुद्देमालासह गुन्ह्याचे पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिरातील चोरी सारखा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा 24 तासाचे आ उघडकीस आणल्याने नागरिकांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी या गंभीर गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकास 10 हजार रुपये रोख बक्षिस जाहीर केले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक विकास कापूरे, मोहन ढमढेरे पोलीस अंमलदार अभय राजपूत, शोएब शेख यांच्या पथकाने केली आहे.








