नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी आज तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. एक ग्रामपंचायत यापुर्वीच बिनविरोध झाल्या. या १८ पैकी १० ग्रामपंचायतींवर शिवसेना शिंदे गटाने तर ८ ग्रामपंचातींवर भाजपाने दावा केला आहे. असे असले तरी पूर्व पट्ट्यात माजी आ.चंद्रकात रघुवंशी तर पश्चिम पट्टयात पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांना फटका बसला असून पारंपारीक ग्रामपंचायती त्यांच्या हातातून निसटल्या आहेत.
नंदुरबार तालुक्यातील दुसर्या टप्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्या १२३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली. यात तालुक्यातील कान्हळदे ग्रामपंचायात बिनविरोध होवून भाजपाच्या ताब्यात आली. उर्वरीत १७ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी ४७ तर सदस्य पदासाठी ३१८ उमेदवार रिंगणात होते. रविवारी १७ ग्रामपंचायतींसाठी ५९ मतदान केंद्रांवर ११ हजार ७८५ महिला तर १२ हजार २३० पुरुष मतदारांनी मतदानाचा बजावला.
सरासरी ८२.६१ टक्के मतदान झाले होते. आज दि.२० डिसेंबर रोजी नंदुरबार येथील तहसिल कार्यालयात प्रशासनातर्फे मतमोजणी करण्यात आली. यासाठी ९ टेबल लावण्यात आले होते. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. दुपारी १२.३० वाजेपर्यंत १७ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी पूर्ण झाली. यावेळी तहसिलदार भाऊसाहेब थोरात, संदिप वाडीले यांच्यासह कर्मचार्यांनी काम पाहिले.
शिंदे गटाचा १० तर भाजपाचा ८ ग्रामपंचायतींवर दावा
नंदुरबार तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींपैकी शिवसेना शिंदे गटाने कोठडे, करणखेडा, धानोरा, खैराळे, तिसी, राकसवाडे, ढंढाणे, तलवाडे बु, घुली, ओसर्ली या ग्रामपचायतींवर तर भाजपाने रनाळे, रजाळे, आसाणे, घोटाणे, सातुर्खे, अमळथे, चौपाळे या ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. आधीच कान्हळदे ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून भाजपाच्या ताब्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील विजयी लोकनियुक्त सरपंच
१) कोठडे – मनिषकुमार सुरेश पाडवी (विजयी-३६०),अविनाश विक्रम पाडवी (२२७),रिना कैलास वळवी (१९२).
२) करणखेडा- जामीला बढ्या नाईक (विजयी-५९९), छबिबाई डोंगर वळवी (३५६).
३) धानोरा – रिना प्रकाश पाडवी (विजयी-१२२०), निलम मोहन वसावे (११७०).
४) खैराळे -उरीदास मनशा गांगुर्डे (विजयी-७६२), सुरज राजु साळवे (६५१).
५) तिसी -दिलीप पोपट पाटील (विजयी-२३३), राहुल श्रीराम कुवर (१५४),भगवान नागो पाटील (२३).
६) राकसवाडे -अविनाश अंबरसिंग भिल (विजयी- ४८२), आशाबाई विनोद वळवी (१५४).
७) ढंढाणे -फुलसिंग हरसिंग ठाकरे (विजयी-५८१), दाजमल मदन सोनवणे (१९६), रजेसिंग जंगलु सोनवणे (१२९ ).
८) तलवाडे बु. – विद्या दिनेश पाटील (विजयी – ६९८ ), सुरेखा साहेबराव पाटील (विजय- ६०१ ).
९) घुली – कुसुमबाई बाबुराव ठाकरे (विजयी- २३९), शर्मिला लक्ष्मण ठाकरे (१९३ ), साराबाई नामदेव नाईक (१८).
१०) ओसर्ली – जयश्री अमोलसिंग गिरासे (विजयी- ५७४ ), जागृती सोपान सोनवणे (३१३).
११) रनाळे – नलिनी जितेंद्र ओगले (विजयी- २ हजार ७७२ ), उज्वला गोकुळ नागरे (१०३१ ), मोगीबाई लखन भिल (४२५).
१२) रजाळे – राजु देवचंद मराठे (विजयी- ८९४), प्रमोद गुलाब पाटील (६५१ ), सरला धनराज पाटील (७०).
१३) आसाणे – सिमा शरद पाटील (विजयी- ६४४ ), ललीताबाई भारत पाटील (६३१ ), उषाबाई पंढरीनाथ पाटील (४४८).
१४) घोटाणे – सचिन मगन धनगर (विजयी- ९२३ ), सुभाष उखा बावा (८८३).
१५) सातुर्खे – वंदनाबेन हिरालाल पाटील (विजयी – ३९८ ), माया अशोक पाटील(१६१ ).
१६) अमळथे – रमणबाई गुलाब कोळी (विजयी – २४० ), भारतीबाई गुलाब कोळी (११३ ).
१७) चौपाळे – कुष्णा आत्माराम ठाकरे (विजयी- १०१७ ), नामदेव फका भिल (१००६), चंदर कड्या भिल (५७ ).
दरम्यान धानोरा, आसाणे व चौपाळे येथे पुनर्मतमोजणी करण्यात आली. त्यात मतांमध्ये कुठलाही फरक पडला नाही. तालुक्यातील घुली येथील प्रभाग क्रमांक ३ मधील सदस्य पदाचे उमेदवार नवनाथ रमेश भिल व भिका आनंदा ठाकरे यांना प्रत्येकी ३१ मते पडल्याने सात वर्षीय तन्मय जयेश सोनवणे या बालकाने ईश्वर चिठ्ठी काढली. यात नवनाथ रमेश भिल विजयी झाले.
पारंपारीक ग्रामपंचायती गमावल्या
नंदुरबार तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीसाठी मोठी चुरस पहायला मिळाली. सर्व पक्षांनी आपली ताकद लावली होती. पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या ताब्यात असलेल्या पश्चिम पट्टयातील करणखेडा, धानोरा, घुली, राकसवाडे, खैराळे, कोठडे, ढंढाणे या ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे. तर नंदुरबार तालुक्यातील पुर्व पट्टयात शिंदे गटाचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या ताब्यात असलेल्या घोटाणे, आसाणे, रजाळे या ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात गेल्या आहेत. दरम्यान, तालुक्यात १० वर्षापासून शिवसेना (उबाठा) च्या ताब्यात असलेली रनाळे ही एकमेव ग्रामपंचायत भाजपाने ताब्यात घेतली. धानोरा ग्रामपंचायत पालकमंत्री यांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायत शिंदे गटाने काबीज केली.








