नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा दौर्यावर दोन दिवसांपूर्वी विधान मंडळाची महिला व बालकांचे हक्क समिती आली असता जिल्हा परीषदेच्या विविध विभागांकडून काही रक्कम गोळा केली जात असल्याची चर्चा होती. यामुळे अशा समित्या आल्यावर त्यास टोल द्यावा लागतो का? असा सवाल जि.प.सदस्य भरत गावित यांनी उपस्थित केला. टोल गोळा करण्याचे फर्मान काढण्याऐवजी गुणवत्ता वाढीसाठीचे फर्मान शिक्षण विभागाने काढण्याचा सल्ला यावेळी जि.प.सदस्यांनी दिला.तसेच अपंग युनिट संदर्भात शिक्षकांना सामावून घेण्यासाठी प्रत्येकाकडून ४० हजार रुपये रक्कम मागणी करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्याचे जि.प.सदस्यांकडून सांगण्यात आले.
नंदुरबार जि.प.ची सर्वसाधारण सभा याहामोगी सभागृहात पार पडली. यावेळी जि.प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला विविध विषय अजेंड्यावरील विषयांचे वाचन करण्यात आले.यावेळी बैठकीत शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह असणार्या कर्मचार्यांची बीले जि.प.प्राथमिक विभागाच्या कार्यालयात पेंडींग असून जाणीवपूर्वक सदर बीले मंजूर केली जात नसल्याचा आरोप जि.प.सदस्यांकडून करण्यात आला. तसेच दोन दिवसांपूर्वी विधान मंडळाची महिला व बालकांचे हक्क समिती नंदुरबार जिल्हा दौर्यावर येत असल्याने रक्कम गोळा केली जात असल्याची चर्चा होती. यामुळे जि.प.सदस्यांकडून अशा समिती आल्यावर टोल गोळा करावा लागतो का? असा सवाल जि.प.सदस्य भरत गावित यांनी उपस्थित केला. टोल गोळा करण्याचे फर्मान काढण्याऐवजी गुणवत्ता वाढीसाठीचे फर्मान काढण्याचा सल्ला शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राहूल चौधरी यांना देण्यात आला. तसेच अपंग युनिट संदर्भात शिक्षकांना सामावून घेण्यासाठी प्रत्येकाकडून ४० हजार रुपये रक्कम मागणी करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्याचे जि.प.सदस्यांकडून सांगण्यात आले. यामुळे जि.प. जनतेच्या विकासासाठी की अधिकार्यांच्या कमाईसाठी? असा सवाल देखील जि.प.सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला. तसेच पोषण आहारात भ्रष्टाचार होवू नये यासाठी ५० किलोच्या गोणीत धान्य कमी येत असेल तर त्याची मोजणी करण्यात यावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या. तसेच विविध विषयांबाबत ऐनवेळेला सदस्यांना कळविण्यात येत असल्याने आठवडाभरापूर्वी याबाबत अजेंडा मिळणे अपेक्षित असल्याचे सदस्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत यांत्रिकी उपविभागासाठी मजूर, इंधनविहिर, कुपनलिका खोदाई व हातपंप उभारणी कामासाठी हातपंप संच इंडीयामार्क दोन रायझर पाईपसह खरेदी करण्यासाठी ई निविदा प्राप्त कमीत कमी दरास व ५२. ५६ लाखाचा निविदा स्विकृतीस यावेळी मजूरी देण्यात आली. यासह नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यासाठी २०.७५ लाख इतका निविदेसाठी खर्च अपेक्षीत आहे. त्यामुळे हा विषय जि.प. सभापुढे सादर करण्यात आला. या बैठकीत एन.एस.डब्ल्यु.ए.एन. व्हीडीओ कॉन्फरसाठी लागणारे साहित्य व अनुसंघीक बाबीसाठी दोन लाख खर्चास मंजूरी देण्यात आली. यासह सन २०२१-२२ जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेअंतर्गत लेखा शिर्षक अंतर्गत मंजूर निधी अंगणवाडी इमारत बांधकाम व आणि अंगणवाडी इमारत किरकोळ दुरूस्तीसाठी यासाठी मंजूर करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी मंजुर असलेल्या अंगणवाडी बांधकामासाठी ग्रामपंचायतींचे अधिकार काढून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सद्याच्या स्थितीला जिल्ह्यातील ३८७ अंगणवाडया भाडेतत्वाच्या इमारतीत सुरू आहेत. अशी माहिती यावेळी देण्यात आली. तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर राहत नाही. याबाबत जि. प.सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
नवापूर तालुक्यात गुरांवर लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. सुरूवातील तीन ते चार गावातील गुरांचा पूर्ण तालुक्यात पसरला असून यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना दहा हजारांची तरतूद करण्याची सूचना केली होती. मात्र या निधीत लसीकरण होणार नसल्याने जिल्हा परिषदेने लसीकरणासाठी २० लाखांची तरतूद करण्यात यावी. अशी मागणी जि.प. सदस्य भरत गावीत, दिपक नाईक, अजित नाईक यांनी केली. यावेळी सर्वसाधारण सभेत या विषयाला जिल्हा परिषदे अध्यक्षा ऍड.सीमा वळवी यांनी मंजूरी दिली.