नंदुरबार l
शहादा तालुक्यातील लक्कडकोट ते राणीपूर रस्त्यावर बसने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील गणेशा बयसिंग ठाकरे व नरेंद्र दारासिंग पाडवी हे दुचाकीने लक्कडकोट ते राणीपूर रस्त्याने जात होते. यावेळी एका एस.टी.बस चालकाने त्याच्या ताब्यातील बस रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात बस चालवून विठ्ठल चौधरी यांच्या शेताजवळ दुचाकीला धडक दिली.
या अपघातात नरेंद्र पाडवी या तरुणास गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच गणेशा ठाकरे यांनाही दुखापत झाली आहे. याबाबत गणेशा ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे करीत आहेत.