नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनातर्फे वेळोवेळी पारित होणाऱ्या शासन निर्णय आणि अध्यादेश यांची काटेकरपणे अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करीत अशा आशयाचे निवेदन सफाई कर्मचारी आयोगाच्या माजी सदस्या आणि माजी नगराध्यक्षा सौ. शिला रमेश कडोसे यांनी मुख्याधिकारी यांना दिले.
नंदुरबार नगर पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाड व पागे समितीच्या माध्यमातून 1975 पासून शासनाने मेहतर समाजाचे उत्थान व्हावे यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. मात्र अलीकडच्या काळात अनेक नगर परिषदांमध्ये शासनाच्या अध्यादेशांचे काटेकरपणे पालन होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत राज्यातील अनेक नगर पालिकांमधील मुख्याधिकारींनी सफाई कामगारांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवु नये याबाबत संचालकांनी वेळोवेळी सूचना केलेल्या असताना मुंबई येथे चकरा माराव्या लागतात. लाड व पागे समितीच्या अहवालानुसार तीस दिवसाच्या आत स्थानिक स्तरावर निर्णय होण्याबाबत शासनाचे धोरण आहे. मात्र राज्यातील अनेक नगर पालिका याबाबत अंमलबजावणी करीत नसल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगराध्यक्षा सौ. शिलाबाई रमेश कडोसे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन दिले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कमल कडोसे उपस्थित होते.








