अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथील महेश परमसुख तंवर यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या अवैध धंद्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केली आहे.
विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, अक्कलकुवा येथील महेश परमसुख तंवर व त्यांच्या परिवारातील सुरेश परमसुख तंवर, रमेश परमसुख तंवर हे गेल्या अनेक वर्षापासून अक्कलकुवा शहरात बिन बोभाट पणे खाण्याच्या तेलात भेसळ करीत आहेत. बनावट लेबल तयार करुन त्यांची पॅकेजिंग करून बाजारपेठेत भेसळ तेलाची विक्री करीत आहेत परिणामी नागरिकांना भेसळ तेलामुळे विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे .
या व्यवसायाकडे शासनाच्या अन्न भेसळ व औषध प्रशासन या विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. तसेच महेश परमसुख तंवर व त्यांचे कुटुंबीयांचे अक्कलकुवा शहरात, तालुक्यात व बाहेरच्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे आहेत .दारु बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या महु फुलांची अक्कलकुवा शहरात राजरोसपणे विक्री होत आहे.याकडे स्थानिक पोलीसांनी व तालुका प्रशासनाने पुर्णतः दुर्लक्ष केले आहे असा आरोप केला आहे.
निवेदनात पुढे नमुद केले आहे की, अफीम सारख्या मादक पदार्थांच्या विक्री प्रकरणी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर गुजरात राज्यात गुन्हा दाखल झालेला आहे असे असताना देखील सदर परिवार अवैध धंद्यात पूर्णपणे बुडाला असून अवैध धंद्यांच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमवलेली आहे आणि या मालमत्तेच्या जोरावर गरीब आणि अशिक्षित जनतेची दिशाभूल करुन त्यांचे आरोग्य आणि जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबीयांची चौकशी करून त्यांच्या कुटुंबियांवर अन्न भेसळ प्रतिबंधक तसेच इतर आवश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.योग्य चौकशी न झाल्यास महेश परमसुख तंवर यांच्या अवैधंद्याविरुद्ध तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा आमदार आमश्या पाडवी यांनी दिला आहे.









