नंदुरबार । प्रतिनिधी

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रसंगी पक्षाचा व्हीप झुगारुन विरोधी पक्षाला मतदान करणार्या काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या अनर्हतेबाबत दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या दालनात सुनावणी झाली.मात्र यावेळी बाजू मांडण्यासाठी फुटलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांच्या बाजूने कोणीही वकील उपस्थितन सल्याने पुढील सुनावणी ३० डिसेंबर रोजी होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या गेल्या महिन्यात झालेल्या जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुहास वेच्या नाईक, निलुबाई नटवरसिंग पाडवी, सुरैय्याबी अमीन मक्राणी, श्रीमती हेमलता अरुण शितोळे, प्रकाश फकिरा कोकणी यांनी गटनेते सी.के.पाडवी यांनी काढलेला पक्षादेश झुगारुन विरोधी उमेदवाराला मतदान केले.
याबाबत गटनेता सी.के.पाडवी यांनी जिल्हाधिकार्यांकडे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अनर्हता अधिनियम 1986 चे कलम 3 व 7 नुसार संबंधीतांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीबाबत दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या दालनात सुनावणी झाली.
यावेळी फुटलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांच्या बाजूने कोणीही वकील उपस्थित नव्हते.मात्र प्रस्ताव दाखल करणाऱ्यांचा बाजूने संभाजीनगर येथील वकील होते.फुटलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांच्या बाजूने कोणीही वकील उपस्थित नसल्याने ही सुनावणी ३० डिसेंबर रोजी होणार आहे. या तारखेला वकील आणावा तरच युक्तिवाद ऐकला जाईल अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या.यावेळी शिवसेनेचे प्रतोत ॲड.राम रघुवंशी उपस्थित होते.









