नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ त्वरीत मिळावा, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे नंदुरबार तालुका अध्यक्ष योगेश नामदेव पाटील यांनी नंदुरबार तालुका पंचायत समितीकडे केली आहे. तसे निवेदन त्यांनी पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी गोपाल चौधरी यांना दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यात शेकडो दिव्यांग बांधव असून महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग बांधवांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्धतेसाठी तसेच शासनाकडून मदत म्हणून ग्रामपंचायतीमार्फत पाच निधी टक्के राखीव ठेवण्यात येतो. परंतू नंदुरबार तालुक्यात दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतस्तरावर पाच टक्के निधीचे वाटप केले जात नाही. तसेच दिव्यांगांसाठीच्या स्वयंरोजगार योजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावर जागा आरक्षित करुन दिव्यांगांना प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात जागा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच दिव्यांग बांधवांना स्वयंम रोजगारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध महामंडळांच्या योजनेतून त्वरीत कर्ज उपलब्ध व्हावे. जिल्हा परिषदेकडे व पंचायत समितीकडे समाजकल्याण विभागांतर्गत दिव्यांग बांधवांचा राखीव निधी फक्त दिव्यांग बांधवांच्या जीवनमान उंचावण्यासाठीच खर्च करावा. दिव्यांगांच्या नावाने आलेला निधी इतरत्र वळविण्यात येवू नये. तसेच दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेत पाच टक्के आरक्षण देवून दिव्यांगांचा घरकुलाचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा. व अंत्योदय योजनेत दिव्यांग बांधवांच्या नोंदणी करुन त्वरीत अंत्योदय कार्ड दिव्यांग बांधवांना देण्यात यावे. वरील विषयांवर प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी दिव्यांग बांधवांमध्ये साहेबराव कोळी, नामदेव पाटील, अक्षरा मराठे, नामदेव मराठे, वंदनाबाई धनगर, राजु धनगर, जितेंद्र पाटील, अमोल पाटील, ईश्वर गंगावणे आदी उपस्थित होते.