सारंगखेडा l प्रतिनिधी
श्री .एकमुखी दत्त यात्रेला अवघे दोन दिवस उरले आहेत .कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर यावर्षी मोठया उत्साहात यात्रा होत आहे . यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होता कामा नये . तसेच सेवा सुविधांमध्ये हयगय करू नका , अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केल्या . ८ डिसेंबर पासून सारंगखेडा येथील यात्रोत्सवाला सुरुवात होत आहे . या यात्रेत मोठया प्रमाणावर देवदर्शनासह यात्रेकरु , अश्व विक्रेते ,चेतक फेस्टिव्हल ला येतात . या यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीबाबत आढावा व पाहणी करण्यात आली .

यावेळी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल , तहसीलदार डॉ . मिलिंद कुळकर्णी , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे , गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे , मुख्य अभियंता अनिल बोरसे , उप कार्यकारी अभियंता भुषण जगताप ,सरपंच पृथ्वीराजसिंह रावल , पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ , कनिष्ठ अभियंता सचिन पावरा , दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंबालाल पाटील , सचिव भिक्कन पाटील , वैज्ञानिक अधिकारी चंद्रशेखर पाटील , मंडळ अधिकारी जुबेर पठाण , ग्रामसेवक श्री . गावीत , तलाठी श्री .डिंगराळे आदी उपास्थित होते .

जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षितता व दर्शनासंदर्भातील माहिती जाणून घेतली . कोणत्याही परिस्थितीत भाविकांची गैरसोय होणार नाही , याची दक्षता घ्यावी , रविवार व गुरुवार या दिवशी गर्दी वाढते त्या दिवशी विशेष दक्षता घ्यावी . याठिकाणी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी , स्वच्छता गृह , विज ,बस वाहतूक , पार्किग , आरोग्य आदी सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात अशा सुचना दिल्या .
अश्व बाजाराची पाहणी
श्रीमती खत्री यांनी अश्व बाजाराची पाहणी केली . अश्व बाजारात देशातील विविध भागातून देखणे अश्व येथे दाखल होत आहेत . पशुसंवर्धन विभागाने अश्वांची तपासणी , निघा , आरोग्य बाबत सूचना दिल्या , रायडिंग बाबत माहीती घेतली . रायडिंग करणाऱ्यांना हेल्मेट देण्याची गरज व्यक्त केली . अश्व बाजारात धुळ उडू नये याची काळजी घ्यावी , तसेच चेतक फेस्टीव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी चेतक फेस्टिव्हल मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितल्या .