नंदुरबार l प्रतिनिधी
कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे . नंदुरबार जिल्ह्यात कोरोना प्रादूर्भाव कमी झाला असला तरी आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी गणेश मंडळांनी नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करावा . एक खिडकी योजनेतून तात्काळ परवानगी घेण्यात यावी.असे आवाहन पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी गणेश मंडळांना केले आहे .
नंदुरबार जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे . तसेच वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या जिल्ह्यातील तीन टोळ्यांवर दोन वर्ष तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत . यात सुमारे ४० ते ४२ इसमांचा समावेश आहे . तसेच अक्कलकुवा येथील एका संशयितावर सुमारे २२ गुन्हे दाखल असल्याने त्यास स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली .गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे . गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे १०० मंडळांनी नोंदणी केली होती . यावर्षी सुमारे ४५० ते ५०० सार्वजनिक गणेश मंडळाकडून नोंदणी होणे अपेक्षित आहे . असे असतांना अद्याप अवघ्या ५० मंडळांनी एक खिडकी योजनेतून परवानगी घेतली आहे . यामुळे गणेश मंडळांनी तात्काळ परवानगी घेणे गरजेचे आहे . यावर्षी देखील विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्मिती करण्यात येणार आहेत . गणेश मंडळांनी गणराय प्रशासनाकडे दिल्यास एकत्रितरित्या विधिवतपणे गणरायाचे प्रशासनातर्फे विसर्जन करण्यात येईल . असे केल्यास गर्दी देखील होणार नाही , असे पोलिस अधिक्षक पंडीत म्हणाले . दरम्यान , नंदुरबार शहरातील २ ९ पैकी ९ सीसीटीव्ही कॅमेरे सुरु आहेत . उर्वरित १ ९ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून गणेशोत्सवा पूर्वी ते सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे पंडीत यांनी सांगितले .