नवापूर l प्रतिनिधी
राज्यात सद्य:स्थितीत ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सुरू असलेला सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम व ७ हजार १४७ सहकारी संस्थांचा निवडणूकीचा कार्यक्रम हे एकाच कालावधीत असल्याने जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीत सहभाग नोंदविता यावा यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणूका या ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर २० डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालयाने २९ नोव्हेंबरला आदेश पारित केला. राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर च्या आदेशान्वये १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
यामध्ये निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणे, नामनिर्देशन दाखल करणे, छाननी करणे, नामनिर्देशन मागे घेणे, मतदानाचा दिनांक, मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दिनांक नमूद केला आहे.
सदर ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल २० डिसेंबरला असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक २३ डिसेंबर आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सध्यस्थितीत ७ हजार १४७ इतक्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील सुरु करण्यात आला आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेल्या ७ हजार १४७ सहकारी संस्थांपैकी अ वर्ग, ३८ ब वर्ग ११७०, क वर्गातील ३१५१ व ड वर्गातील २७८८ सहकारी संस्था आहेत.
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरु असल्याने गावागावामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच, अ व ब वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या ही मोठ्याप्रमाणात असून या वर्गातील सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेचशे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात सद्य:स्थितीत ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा सुरू असलेला कार्यक्रम, त्याचप्रमाणे ७ हजार १४७ सहकारी संस्थांचा निवडणूकीचा कार्यक्रम हे एकाच कालावधीत असल्याने जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीत सहभाग नोंदविता यावा यासाठी,
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कक मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, वर्ग क, ड तसेच, वर्ग इ प्रकारच्या सहकारी संस्था, त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी उच्च/सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे,
अशा सहकारी संस्था वगळून, राज्यातील अ व ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर २० डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत.
ज्या वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आल्या नाहीत. त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणूका घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. २ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी होता. ३ नोव्हेंबरला अर्जांची छाननी झाली.
४ ते १८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी माघारी घेण्याचा कालावधी होता. १९ नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध झाली.दोन संचालकांच्या जागा बिनविरोध झाल्याने आता १५ जागांसाठी मतदान होणार होते. यासाठी ३ डिसेंबरला मतदान व ४ डिसेंबरला मतमोजणी होणार होती.
मात्र, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालयाने काढलेल्या आदेशामुळे तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच होणारी निवडणूक २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.








