नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील लक्ष्मीनगर परिसरातील खंडेराव मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त तळीआरती करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करत खंडेरायाचे दर्शन घेतले.
नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील खंडेराव मंदीरात दरवर्षी चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात येतो.भाविकांच्या नवसाला पावणारे देवस्थान म्हणून या मंदीराची ख्याती आहे.यामुळे अनेक जण येथे नवस मानत असून अनेकांच्या नवसाला खंडेराव पावतात.
नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर परिसरात खंडेरावांचे हे एकमेव मंदीर आहे.काल चंपाषष्ठी असल्याने हजारो भाविकांनी दर्शनासाठी रिघ लावली होती. तसेच घरोघरी बाजरीची भाकरी, वांग्याच्या भरीताचा नैवेद्य दाखवून तळीआरती करण्यात आली.
आख्यायिकेनुसार खंडोबा फक्त महाराष्ट्रातील कुल दैवत नसून कर्नाटकमध्ये अनेकांचे कुलदैवत आहेत. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाचष्ठी असे म्हणतात. या दिवशी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेवून मणी आणि मल्ल दैत्यांचा वध केला. मार्तंड मल्हारी महादेवाचा अवतार होता असे सांगण्यात येते.
शंकरांनी मार्तंड भैरवाचे रुप घेवून आपले सात कोटी म्हणजेच येळकोट सैन्य घेवून राक्षसांवर हल्ला केला. मार्तंड भैरवांनी मल्ल आणि मणी यांची छाती फोडून त्यांचा अंत केला. यामुळे या दिवसाला महत्व आहे. दरम्यान, चंपाषष्ठीनिमित्त काल वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचे नैवद्य देवाला दाखविण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.








