नंदुरबार l प्रतिनिधी
शासकीय संस्थेच्या भिशीचे काम करीत असल्याचे भासवून सुमारे २१ लाख रुपये भिशीचे पैसे बळकावत फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरात्तील साक्री नाका परिसरातील निता प्रकाश चौधरी व साक्षीदार यांना शारदा संजय चौधरी व संजय सखाराम चौधरी यांनी शासकीय संस्थेचे भिशीचे काम असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.
तसेच एका इंग्रजी मजकूर असलेल्या कागदावर सही घेवून भिशी लवकर लागल्याचे आमीष दाखवून दिशाभूल केली. निता चौधरी व साक्षीदार यांच्याकडून वेळोवेळी २० लाख ८० हजार बळकावून स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करुन फसवणूक केली.
याबाबत निता चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात शारदा चौधरी व संजय चौधरी यांच्याविरोधात भादंवि कलम ४२०, १२० (ब) सह महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माळी करीत आहेत.