तळोदा | प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बैठक आज तळोदा येथे पार पडली.बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.’अंनिस विचार संवाद यात्रा’ काढून डाकीण प्रथा उच्चाटनासाठी प्रशासनाला सोबत घेऊन प्रयत्न करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला.
बैठकीचे उद्घाटन महाराष्ट्र अंनिसच्या तळोदा शाखा उपाध्यक्ष तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुवर्णा सोलंकी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ डी बी शेंडे,अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे,जिल्हा प्रधान सचिव किर्तीवर्धन तायडे,समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा निलेश गायकवाड,तळोदा शाखा अध्यक्ष मंगलसिंग पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या विविध संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील संघटना बांधणी,शाखा कार्यकारी रिपोर्टिंग, संघटना वाढ व विस्ताराच्या शक्यता, जबाबदारी, नवीन ठिकाणी शाखा सुरू करणे याबाबत तालुकानिहाय कालबद्ध नियोजन करण्यात आले.जिल्हास्तरीय दोन दिवसीय संघटना बांधणी शिबिर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचा निर्णय जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
बैठकीत महाराष्ट्र अंनिसच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभागाअंतर्गत आतापर्यंत घेण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयांच्या सहकार्याने आश्रमशाळा शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली.प्रशिक्षण विभागाकडून जिल्हा स्तरावर आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. त्यात सोशल मीडिया व्यवस्थापन व डिजिटल डॉक्युमेंटेशन शिबिर घेण्याबाबत देखील बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय अंनिसच्या कामात जिल्ह्यात युवांचा सहभाग वाढवण्यासाठी कृती कार्यक्रम ठरवणे व त्यासाठी जबाबदारी निश्चित करणे व महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी नियोजन करणे व आखणी करणे इत्यादी विषयांवर देखील बैठकीत चर्चा झाली.या जिल्हा बैठकीला नंदुरबार,शहादा,नवापूर, अक्कलकुवा,येथील अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचे आयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तळोदा शाखेच्या वतीने करण्यात आले होते. बैठकीच्या यशस्वितेसाठी तळोदा शाखेचे कार्याध्यक्ष मुकेश कापुरे, प्रधान सचिव अमोल पाटोळे, प्रा सुनील पिंपळे,प्रा डॉ प्रशांत बोबडे प्रा रविकांत आगळे,प्रा राजू यशोद,अनिल निकम,स्वप्निल महाजन,आदीनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले.
डाकीण प्रथा उच्चाटनासाठी प्रशासनासोबत प्रयत्न करणार
नंदुरबार जिल्ह्यात आज ही डाकीण प्रथेचा प्रश्न गंभीर असून अनेक महिला या प्रथेला बळी पडत आहेत.नुकतेच अक्कलकुवा तालुक्यातील सरी येथील डाकीण प्रकरणात अंनिसच्या माध्यमातून महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासह सातपुडा अनेक महिलांना डाकीण ठरवून त्यांचा छळ केला जात असल्याचे प्रकरणे घडत असून सातपुड्यातील डाकीण प्रथेच्या उच्चाटनासाठी प्रशासनाला सोबत घेऊन काम करण्याची निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, या संबंधी चर्चा करत असताना पोलीस प्रशासन डाकीण पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेताना उदासिनता दाखवत असल्याची बाब समोर आली. डाकीण प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा या संदर्भात अंनिसच्या वतीने प्रबोधन अभियान राबवण्यात बाबत देखील बैठकीत चर्चा झाली.याशिवाय येत्या काही दिवसात महाराष्ट्र अंनिसच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात असलेल्या धडगाव,मोलगी,अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात ‘अंनिस विचार संवाद यात्रा’ काढून या यात्रेच्या निमित्ताने सातपुड्यातील डाकीण प्रथेच्या विरोधात प्रशासनाला सोबत घेऊन प्रबोधन मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.