नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी येणारा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
बैठकीस खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या की, राज्यात कोरोना प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. तिसरी लाट आलीच तर ती खुप धोकादायक असू शकते. त्यामुळे राज्य शासनाने गणेशोत्सवाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सर्वांनी करावे. एक गाव एक गणपती संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमंडळांनी श्रींची स्थापना करावी. आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. सण-उत्सवाच्या काळात अनावश्यक गर्दी करु नये. मास्क व सॅनीटायझरचा वापर करावा.
वीज वितरण कंपनीने उत्सवकाळात अंखड वीज पुरवठा सुरु राहील यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर खड्डे पडले असतील त्याठिकाणी भराव करुन दुरुस्तीची कामे करावी. असे निर्देश त्यांनी दिले.
खासदार डॉ.गावीत म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी शेजारील जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लस रुग्ण आढळत असल्याने यंदाचा गणेशोत्सव साजरा करतांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे.
आमदार पाडवी म्हणाले की, सर्व गणेशमंडळांनी शक्यतोवर लहान आकाराची मुर्तींची स्थापना करावी. शाडूच्या पर्यावरणपूरक मुर्त्याचा वापर करावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्य विषयक उपक्रम. आरोग्य शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
श्री.पवार म्हणाले, शासनाच्या मार्गदशक सुचनांचे पालन करुन येणारा गणेशोत्सव साधेपणाने, सुरक्षित व संयमाने साजरा करावा. आगामी सण-उत्सव काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.