नंदूरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्य शाळा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, गांधीनगर यांनी इयत्ता चौथीच्या मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकात साक्री तालुक्यातील जि.प.शाळा इंदवे येथील शिक्षक कवी डॉ. नरेंद्र बापूजी खैरनार यांच्या कवितेची निवड केली आहे.

गुजरात मधील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रमाची रचना केली जाते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून पुढील दहा वर्षांसाठी हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आलेले आहे. इयत्ता चौथीच्या ‘कुहू’ या प्रथम भाषा मराठीच्या पाठ्यपुस्तकात कवी डॉ. नरेंद्र खैरनार यांच्या जादूगार या विषयावरील ‘जंतर मंतर बमचिक बम’ या आनंददायी कवितेचा समावेश करण्यात आला आहे.
उपक्रमशिल शिक्षक व साहित्यिक म्हणून सर्वदूर परिचित असलेले डॉ. नरेंद्र खैरनार यांच्या कविता बालभारती प्रकाशनाच्या ‘किशोर’ मासिका सोबतच महाराष्ट्रातील प्रथितयश नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यांत कार्यरत असताना शैक्षणिक,सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्याबद्दल २०१६ चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. धुळे व जळगाव आकाशवाणी केंद्राच्या विविध कार्यक्रमात त्यांचा लेखनासह सहभाग असतो. आतापर्यंत त्यांचे काव्यसंग्रह, प्रबोधन गीतसंग्रह,अशी चार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. लवकरच पीएचडी प्रबंधावरील त्यांचा समीक्षा ग्रंथ व बाल काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
गुजरात राज्याच्या पाठ्यपुस्तक मंडळाने डॉ. नरेंद्र खैरनार यांच्या कवितेची घेतलेली दखल धुळे जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे. असे नमूद करीत साक्री पं.स.चे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, शि.वि.अ.व्ही व्ही पवार, केंद्र प्रमुख डी.डी.मुजगे, इंदवे येथील जि.प.सदस्य पोपटराव सोनवणे व साक्री तालुक्यातील साहित्यिक व सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.








