म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे त्री शतकोत्तर परंपरा असलेला ललितोत्सव म्हसावद येथील तरुणाईच्या इच्छाशक्तीच्या जोरावर उत्साहात साजरा करण्यात आला .
म्हसावद येथील वयोवृद्ध व्यक्तींकडून जाणून घेतले असता,म्हसावद येथे ललितोत्सव सुरु झाल्याला तीनशे वर्षांची परंपरा असल्याचे कळले.ललितोत्सव सुरु झाला तोच मुळात विठ्ठल रखुमाई मंदिर चौकात.आज ज्या किशोरवयीन व तरुणाईतील मुलांनी सहभाग नोंदविला.ते चौथ्या पाचव्या पिढीतील वारसदार होत.ललितोत्सवात सहभागी होणारे वृद्ध कलाकार एक एक करीत निधन पावले.मध्यंतरी तीन चार वर्षे ललितोत्सव साजरा होऊ शकला नाही.
त्यातच कोरोनाचे दोन वर्षं खडतर गेल्याने उत्सवावर पाणी फिरले.मात्र गेल्या वर्षी ललितोत्सवात सहभाग घेतलेले,ललितोत्सवातील पदांचे गायन करणारे साठीतील कलाकार तुकाराम छगन पाटील,भगवान गोरख पाटील,भरत ओंकार पाटील,उत्तम उर्फ दिगंबर छगन पाटील,प्रा.पुरुषोत्तम मगन पटेल,संजय रामदास चौधरी,उद्धव सजन पाटील,भरत तुकाराम पाटील,सुरेश शाम पाटील,मधुकर गोविंद पाटील,भबूता त्रिंबक पाटील,वासुदेव सुदाम पाटील यांनी ललितोत्सव साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला.त्यास म्हसावद येथील तरुणाईने जोरदार समर्थन देऊन भूमिका सादर करण्याची तयारी दर्शवली. आणि बंद पडलेला ललितोत्सव श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात उत्साहाने दोन वर्षांपासून पुर्ववत साजरा होऊ लागला आहे.
ललितोत्सव साजरा करण्याचा उद्देश जाणून घेतला असता,ललितोत्सव हा दृष्ट शक्तींवर सृजनशक्तीचा विजयाचे प्रतिक होय. गावावर दुष्काळ,भुकंप,महापूर अशी आपत्ती येऊ नये.यासाठी रात्रभर मशाल जाळती ठेवून ललितोत्सव साजरा होतो.आरंभ श्री.विघ्नहर्ता गणेशाचा आगमनाने व नृत्याविष्काराने होतो.व समारोप ग्रामदेवी भवानीच्या ग्राम प्रदक्षिणेने होतो.असे केल्याने गावात इडा पिडा येत नसल्याची गावक-यांची पुर्वा पार श्रद्धा आहे.
ललीतोत्सवातील विविध वेशभूषा
ललीतोत्सव म्हटला की गावातील आबालवृद्ध स्री-पुरुषांना प्रचंड उत्साह संचारतो.सायं आरतीनंतर रात्री आठ वाजता प्रारंभ होणारा हा उत्सव सकाळी सात वाजेपर्यंत अखंडित सुरु असतो.त्यात गणपती- गजासूर,सरस्वती, हिरण्यकश्यपू दरबार,प्रल्हाद,शुक्राचार्य,नृसिंह प्राकट्य, गुजराती राजा मालोपती कचेरी,दक्ष दरबार,श्रीशंकर- पार्वती- नारदमुनी ,श्रीराम- सिता लक्ष्मण, शुर्पणखावध, सीताहरण, मत्स्यावतार,शंकासूर वध,राम रावणयुद्ध, नंदी,गोसावी, गुरगुडी,गोपाळ,ब्राम्हण,नवनाथांचे आगमन, भांड,भाट,शकून,भराडा,गोंधळी,शेठ-शेटाणी कचेरी,जती,वैदू,माऊली,भगत,इत्यादि मनमोहक पात्राचे मुखवटे घालून प्रत्यक्ष कृतीतून साकारतात.
श्री गणेशाचे पात्र अंबालाल देविदास पाटील आणि ग्राम देवी भवानीचे पात्र डिगांबर छगन पाटील यांनी साकारली.
ललीतोत्सवात जयंत पाटील,कृष्णा पाटील, स्वप्नील चौधरी,लाला पाटील,भुषण पाटील, अनुराग चौधरी,पुष्कर चौधरी,उमेश पाटील, तेजस् चौधरी,सचीन चौधरी,विवेक पाटील, निलेश पाटील,मयूर पाटील,संकेत पाटील, द्वारकेश पाटील,मोहित पाटील,रोहित पाटील, प्रजल पाटील,किरण पाटील,कुणाल पाटील, भावेश पाटील,यांच्यासह इतर तरुणांनी विविध भूमिका साकारल्या.
ललीतोत्सवात भरत ओंकार पाटील यांनी सुत्रधार ,तर ललीतपदांचे गायन तुकाराम पाटील,सुरेश पाटील,रविंद्र चौधरी,माधव चौधरी,मधुकर पाटील,संजय चौधरी,उद्धव पाटील,भरत पाटील,डॉ.मधुकर पाटील यांनी केले.त्यास प्रा.पुरुषोत्तम पटेल यांनी हार्मोनियम वादन आणि वासुदेव सुदाम पाटील यांनी तबला वादन करुन स्वरसाज दिला.
ललीतोत्सव साजरा करण्यासाठी श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी,विकास पाटील,संजय पाटील,किशोर पाटील, यांच्यासह प्रकाश पाटील,अनील पाटील ,अशोक चौधरी,किशोर चौधरी,तुषार चौधरी,यांचे सहकार्य लाभले. मशालजी म्हणून कैलास जाधव,जयेश जाधव यांनी रात्रभर मशाल तेवत ठेवली.रात्रभर सुरु असलेला ललीतोत्सव पाहण्यासाठी म्हसावद ग्रामस्थांसह महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.संपूर्ण ललीतोत्सवात म्हसावद पोलीसांनी शांतता व चोख बंदोबस्त ठेवला.