नाशिक l
आपल्या असाधारण कर्तृत्वाने भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात देवत्व मिळाले, हेच कर्तृत्व अन् देवत्व प्रत्येक आदिवासी बांधवाच्या वाट्याला येण्यासाठी प्रत्येक आदिवासी बांधवाने बिरसा मुंडा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
येथील गोल्फ क्लब मैदानावर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सावाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य सुरू आहे. आदिवासी बांधवांसाठी केवळ योजना, कार्यक्रम न घेता त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्याने आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती संपूर्ण देशात जनजातीय दिवस म्हणून साजरी केली जाते. एवढ्यावरच न थांबता देशात सर्वोच्च राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू यांची निवड करून आदिवासी बांधवांचा यथोचित सन्मानही केला आहे.

देशाच्या प्रत्येक आदिवासी बांधवांच्या उत्थान आणि सन्मानासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असून त्यांच्या समस्या सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
राज्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून वैयक्तिक स्वरूपाचे व सामुहिक स्वरूपाचे दावे मंजूर करून राज्याने आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठीचा एक नवा आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे. कातकरी समाजाच्या घरकुलांसाठी राज्य शासनाने गावठाण जमिनी देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना हक्काचे घरकूल मिळणार आहे. आदिवासींची शिष्यवृत्ती डीबीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यावर कशी जाईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याबरोबरच आदिवासी बांधवांची संस्कृती टिकवण्यासाठी, त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.








