नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील कवली येथे भरधाव वेगात ट्रकने घरासमोर लावलेल्या ट्रॅक्टरला धडक देवून पत्र्याचे शेड तोडून नुकसान केले. तसेच एका चारचाकी वाहनावर ट्रक उलटून त्याखाली दोन म्हशी दाबल्या गेल्याने दोघा म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील कवली येथे एका ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.एम.एच.१२ बीव्ही ७४९७) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रक रस्त्याच्या साईडपट्टी खाली उतरवून भरधाव वेगात सुकलाल उखा भरवाड यांच्या घरासमोर लावलेल्या ट्रॅक्टरला धडक देऊन पत्र्याचे शेड तोडून नुकसान केले.
तसेच एका चारचाकी वाहनावर (क्र.जी.जे.१७ बीएच २८२७) ट्रक उलटून त्याखाली दोन म्हशी दाबल्या गेल्याने दोघा म्हशींचा मृत्यूचा झाला. ट्रक चालकाने सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान केले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत सुकलाल भरवाड यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ४२७, ४२९ मोटार वाहन कायदा कलम १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.संजय सुर्यवंशी करीत आहेत.








