नंदुरबार । प्रतिनिधी
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रसंगी पक्षाचा व्हीप झुगारुन विरोधी पक्षाला मतदान करणार्या काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या अनर्हतेबाबत दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या दालनात सुनावणी होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या गेल्या महिन्यात झालेल्या जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुहास वेच्या नाईक, निलुबाई नटवरसिंग पाडवी, सुरैय्याबी अमीन मक्राणी, श्रीमती हेमलता अरुण शितोळे, प्रकाश फकिरा कोकणी यांनी गटनेते सी.के.पाडवी यांनी काढलेला पक्षादेश झुगारुन विरोधी उमेदवाराला मतदान केले. .याबाबत गटनेता सी.के.पडवी यांनी जिल्हाधिकार्यांकडे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अनर्हता अधिनियम 1986 चे कलम 3 व 7 नुसार संबंधीतांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीबाबत दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी त्यांच्या दालनात सुनावणी ठेवली आहे.
यासाठी संबंधीत सदस्य, निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत








