नंदुरबार l प्रतिनिधी
बहुप्रतिक्षित असलेल्या नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगदा मंगळवारी गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले.
नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावर रेल्वे मार्ग खालून भुयारी मार्ग काढण्यात आलेला आहे. यासाठी २ कोटी ८६ लक्ष रुपयांच्या राज्य शासनाने निधी दिला होता. नंदुरबार शहरातील ४० टक्के वसाहत ही रेल्वे रुळापलीकडील असल्याने वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नागरिकांचे हाल होत होते.शहरातील रेल्वे उड्डाण पुलावरील सततच्या वाहतुकीच्या कोंडीने नागरिक कंटाळले होते.
रेल्वे पलिकडील वसाहतीत जाण्यासाठी दुसरा मार्ग नळवा रस्त्यावरील रेल्वेच्या जुना बोगद्याच्या मार्गावरून देखील वेळोवेळी वाहतूक विस्कळीत होत होती. राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत २ कोटी ८६ लक्ष रुपयांच्या निधी प्राप्त करून नगरपालिकेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित केला. असे असतांना रेल्वेचे या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष राहिलेले होते. मागील वर्षीचा पावसाळ्यानंतर बोगद्याचे काम पूर्ण व्हायला पाहिजे होते. परंतु, रेल्वेपणाच्या दुर्लक्षामुळे रेंगाळत गेले.
काल मंगळवारी सकाळी ११ वाजता बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, शिक्षण सभापती राकेश हासानी, नगरसेवक परवेज खान, दीपक दिघे, रवींद्र पवार,गजेंद्र शिंपी, प्रमोद शेवाळे, फारुख मेमन,रियाज कुरेशी,फरीद मिस्त्री, जगन्नाथ माळी, चेतन वळवी,मोहित राजपूत, अविनाश माळी आदी उपस्थित होते.








