नंदूरबार l प्रतिनिधी
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचा निषेध व जोडेमारो आंदोलन करण्यात आले.दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांनी माफी न मागितल्यास त्याला उत्तर महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय अध्यक्षा अनिता परदेशी यांनी तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.
नेहमीच राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले आहेत. विरोधकांवर टीका करतांना अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील 24 तासांत अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिले जाईल असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी कडून अब्दुल सत्तर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष योगेश मराठे, युवा नेते संदीप परदेशी, नगरसेविका अनिता परदेशी, माजी नगरसेविका सुनंदा पाडवी, मोनाली पाडवी, निकिता राणे, रेखा पाडवी, सुरू बाई पाडवी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत, सरपंच दीपक वळवी, दिनेश वळवी, राहील पाडवी, मुकेश पाडवी, सोनू सोनवणे, आसिफ शेख, इमरान शेख, प्रकाश पाडवी, दिनेश ब्राम्हणे, यांसह तळोदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसद रत्न सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने त्यांना उत्तर महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय अध्यक्षा अनिता परदेशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिला आहे.