नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे झालेल्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये नाशिक शहर पोलीस दलाच्या पुरुषांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रीडा प्रकारात बाजी मारली तर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार भूषण चित्ते व निंबाबाई वाघमोडे यांनी सदर क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत सर्वात्कृष्ट पुरुष व महिला ॲथलीटच्या पुरस्कारावर आपले नावे कोरली.

दि.31 ऑक्टोंबर पासून पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धाचे काल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री.बी.जी. शेखर पाटील, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे व नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलीस दलाच्या कवायत मैदानावर समारोप समारंभ संपन्न झाला.
पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये नंदुरबार, धुळे, जळगांव, अहमदनगर, नाशिक ग्रामीण व नाशिक शहर असे 6 संघ हे सांधिक व वैयक्तिक खेळ यामध्ये स्विमींग, कुस्ती, ज्युडो, बॉक्सींग, वेटलिफ्टींग, 100, 200, 400, 800 मीटर धावणे, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, खो-खो, कबड्डी, गोळाफेक, भालाफेक इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले होते. सदर मध्ये एकुण 776 सांधिक व वैयक्तिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या 3.3 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये नाशिक शहर पोलीस दलाच्या पुरुषांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रीडा प्रकारात सर्वोच्च 142 गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले तर नाशिक ग्रामीण पोलीस दलाचा संघ 96 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर, धुळे जिल्हा पोलीस दल 72 गुण घेवून तृतीय स्थानावर, जळगांव जिल्हा पोलीस दल 69 गुण घेवून चतुर्थ स्थानावर, अहमदनगर पोलीस दल-64 घेवून पाचव्या स्थानावर आणि नंदुरबार जिल्हा पोलीस दल 54 गुण घेवून सहाव्या स्थानावर राहिला.
तसेच नाशिक शहर पोलीस दलाच्या महिलांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रोडा प्रकारात सर्वोच्च 120 गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले तर अहमदनगर पोलीस दलाचा संघ 87 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर, नंदुरबार जिल्हा पोलीस दल 45 गुण घेवून तृतीय स्थानावर, जळगांव जिल्हा पोलीस दल 44 गुण घेवून चतुर्थ स्थानावर, नाशिक ग्रामीण पोलीस दल- 32 गुण घेवून पाचव्या स्थानावर आणि धुळे जिल्हा पोलीस दल- 22 गुण घेवून सहाव्या स्थानावर राहिला. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार भूषण चित्ते व निंबाबाई वाघमोडे यांनी सदर क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत सवोत्कृष्ट पुरुष व महिला ॲथलीटच्या पुरस्कारावर आपले नावे कोरली.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी सांगितले की, खेळ हे मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचे आहे खेळामुळे वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त, गटामध्ये काम करण्याची वृत्ती, आत्मविश्वास या गुणांची वृध्दी होते. पोलीस दलात काम करीत असतांना सततचे बंदोबस्त, कामाचा ताण यामुळे शारीरिक स्वास्थ्याकडे पोलीसांचे कायमच दुर्लक्ष होते. सततच्या या कामाच्या व्यापातून बाहेर पडून पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व अमलदार यांना आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ हे एक महत्वाचे साधन आहे असे सांगून क्रीडा प्रकारामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या पुरुष पोलीस अमलदार, महिला पोलीस अमलदार व सांघिक क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय, तृतीय आलेल्या संघांचे अभिनंदन करुन कौतूक केले. तसेच पुढील काळात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिक शहर व नाशिक परिक्षेत्र हे उत्तम कामगिरी करतील असा मनोदय व्यक्त करुन 34 वी परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा जळगांव येथे आयोजित करण्यात येणार असून ध्वज जळगांव जिल्ह्याकडे दिला.

तसेच पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील राखीव पोलीस निरीक्षक शदेवनाथसिंग राजपूत यांनी सदर स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची राहाण्याची उत्तम व्यवस्था, सर्व मैदाने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुन 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा यांच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमीका बजावली. नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी आभार प्रदर्शन केले.:

सदर समारोप प्रसंगाच्यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, मालेगांव ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, चाळीसगांवचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव तसेच पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस खेळाडू उपस्थित होते.








