शहादा l प्रतिनिधी
शहादा ते सारंगखेडा तसेच शहादा ते शिरपूर या दोन्ही रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आज शहादा तालुकावासियांनी शहादा दोंडाईचा रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते. रस्ता दुरुस्तीचे आश्वासन मिळाल्याने तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचे जाहीर करण्यात आले.

शहादा ते सारंगखेडा तसेच शहादा ते शिरपूर या दोन्ही रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यांवरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतात ऊस उभा राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी शहादा दोंडाईचा रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर रस्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे दोन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती. यावेळी आंदोलन कर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता.
दरम्यान आंदोलक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना पोलीस निरीक्षक दीपक बुधवत यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलकांना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर काही तणाव निर्माण झाला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण साळुंखे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. चार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत सर्वानुमते आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसात परिस्थितीत बदल झाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे. दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वरिष्ठ अधिकारी या दोन्ही रस्त्यांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतील असे लेखी पत्र दिल्यानंतर सर्वानुमते आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी शुक्रवारी शहादा ते सारंखेडा तसेच शहादा ते शिरपूर या दोन्ही महामार्गांची पाहणी करणार आहे तसेच ते आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतील त्याचप्रमाणे शहादा सारंगखेडा रस्त्याची दुरुस्तीचे काम विभागामार्फत सुरू करण्यात आले असून येत्या ४५ दिवसात ते पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, सारंगखेडा चे निरीक्षक राजेश शिरसाट यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला होता.