नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाची बहुचर्चित आनंदाची शिधा या शंभर रुपयाच्या किटला वस्तूंच्या अपुर्ण पुरवठ्या मुळे लाभार्थ्यांच्या घरापर्यंत जाण्याचा मुहुर्त मिळालाच नाही.अखेर दिवाळी संपुन आठवड्याचा कालावधी लोटत असतांना देखील अद्याप पर्यंत रास्त दुकान दारांना वस्तूंचाच पुरवठा करण्याचे काम सुरु आहे. आज पर्यंत किट मधील संपुर्ण वस्तूंचा पुरेसा पुरवठा न झाल्याने तालुक्यातील शिधा पत्रिका धारकांना अद्याप पर्यंत आनंदाची शिधा मधील संपुर्ण वस्तु मिळाल्या नसल्याने गरीब आणि गरजु नागरिकांची दिवाळी आनंदाच्या शिधाच्या आशेवरच गेली. दिवाळी गोड होण्या ऐवजी आनंदावर विरजन पडत आनंदाच्या शिधा योजनेचा बट्ट्याबोळ झाला.
अक्कलकुवा तालुक्यात एकुण 201 स्वस्त धान्य दुकाने आहेत.त्यात अंत्योदयचे 18862 तर प्राधान्य कुटुंबाचे 22004 असे एकूण 40866 शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना आनंदाची शिधा वाटपासाठी एकूण 40,866 किलो साखर तर तेवढेच पामतेल, रवा, चनाडाळ याची आवश्यकता आहे. मात्र आज पर्यंत संबंधित यंत्रणेकडून 37 हजार 764 लिटर पामतेल, 34 हजार 350 किलो रवा, तर 38 हजार 760 किलो चनाडाळ,38 हजार 40 किलो साखर प्राप्त झाली आहे.
तालुक्यातील काही रास्त धान्य दुकानांत पाम तेल,रवा,चनाडाळ,साखर पोहोच करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप पर्यंत संपुर्ण दुकानांत किट मधील सर्व वस्तुंची उपलब्धता दुकान दारांना न झाल्याने तालुक्यातील शिधा पत्रिका धारक हे दिवाळीच्या पर्वात आनंदाच्या शिधा पासुन वंचित झालेत.आज पर्यंत तालुक्यातील 201 दुकानां पैकी जवळपास फक्त 40 दुकानांत किट मधील संपूर्ण वस्तु पोहोच करण्यात आल्या आहेत तर अद्यापही उर्वरित दुकानांत संपुर्ण वस्तुंचा पुरवठा झालेला नाही. तरी देखील उपलब्ध झालेल्या वस्तुंचे नुकसान होऊन झीज होऊ नये यासाठी दुकानदारांनी उपलब्ध वस्तुंचे वितरण करण्यास प्रारंभ केला आहे.
दिवाळी होऊन आठवडा होण्यात आला तरी देखील शासनाच्या या बहुचर्चित योजनेचा पुर्ण लाभ अद्याप पर्यंत शिधा धारकांना होऊ शकलेला नाही त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यात या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. तालुक्यातील 40866 शिधा पत्रिका धारकांची दिवाळी ही आनंदाच्या शिधा अभावी शिधाच्या प्रतिक्षेतच गेली त्यामुळे शिधा पत्रिका धारकांत तीव्र नाराजी पसरली आहे. परिणामी शासनाच्या आनंदाच्या योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला गेल्याचे चित्र अक्कलकुवा तालुक्यात पहावयास मिळाले.अतिदुर्गम भागातील मोलगी गोदामा अंतर्गत येणाऱ्या रास्त दुकानात चारही वस्तू पोहचले नसल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे आनंदाच्या शिधा या किटच्या वितरणासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र छापलेल्या खास तयार करण्यात आलेल्या पुर्ण 40866 पिशव्या मात्र प्राप्त झाल्या आहेत.