नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली.या स्पर्धा 4 नोव्हेंबर पर्यंत होणार आहेत.
पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील मैदानावर 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेला आज 31 ऑक्टोंबर सुरुवात झाली. सदर स्पर्धा दिनांक 31/ऑक्टोंबर ते 4 नोव्हेंबर रोजी दरम्यान खेळविल्या जाणार आहेत. यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस खेळाडु उपस्थित होते.
जनतेची सुरक्षा हे पोलीसांचे कर्तव्य असून त्यासाठी पोलीस दिवसरात्र मेहनत करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. परंतु रात्रगस्त, गुन्ह्याचे तपासकामी बाहेर गावी, बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त इत्यादी अनेक कारणांमुळे पोलीसांचे वैयक्तीक आरोग्याकडे दूर्लक्ष होते त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या व्याधी होवून शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.
पोलीसांनी जनतेच्या सुरक्षेचे व्रत घेतलेले असून त्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. पोलीसांनी जनतेच्या सुरक्षेसोबतच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, त्यासाठी मैदानी खेळ खेळून आपली शरीरयष्टी उत्तम ठेवणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे मैदानी खेळ खेळल्यामुळे आपली शारीरिक स्थिती उत्तम राहाते व मानसिक ताण तणाव देखील दुर होतो,
म्हणून पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून मैदानी खेळांसाठी थोडा वेळ काढुन मैदानी खेळ खेळावे. तसेच खेळामुळे सांघिक काम करण्याची वृत्तीत वाढ होते असे सांगून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची निवड करण्यात येत असते. प्रत्येक खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाला अंतीम निर्णय समजून खेळाडूवृत्ती दाखवावी. तसेच परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेनंतर होणाऱ्या आंतरविभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील प्रत्येक पोलीस खेळाडूंनी नाशिक परिक्षेत्राचे त्याच बरोबर महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव लौकीक करावे अशी अपेक्षा नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी व्यक्त केला.
या स्पर्धा 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या जाणाऱ्या 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये नंदुरबार, धुळे, जळगांव, अहमदनगर, नाशिक (ग्रामीण), नाशिक शहर असे एकुण 6 संघ सामील होणार आहेत. सदर स्पर्धे दरम्यान सांघिक व वैयक्तिक खेळ, यामध्ये स्विमींग, कुस्ती, ज्युडो, बॉक्सींग, वेटलिफ्टींग, 100, 200, 400, 800 मीटर धावणे, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक संघामध्ये साधारणतः 90 खेळाडु असे एकुण 240 सांघिक व वैयक्तिक खेळाडु सहभाग घेणार आहेत. तसेच खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती राहावी तसेच पोलीस दलाचा नावलौकिक राहावा याकरीता सर्व खेळाडूंनी शपथ घेतली. तसेच सदर स्पर्धेची सांगता 4 नोव्हेंबर रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री.बी.जी. शेखर पाटील यांचे उपस्थितीत होणार आहे.परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची आंतर विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात येत असते.








